कांदा दरातील चढ-उतार कधी शेतकरी तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणत असते. अपवादात्मक स्थितीत कांद्याच्या वाढत्या दराचा शेतकऱ्यांना लाभ होताना दिसतो. या परिस्थितीत डोळ्यात पाणी आणण्याचा गुणधर्म असणारा कांदा महिलांच्या रोजगाराचे महत्वपूर्ण साधन ठरल्याचे पुढे आले आहे. कांद्याच्या नफेखोरीवर लक्ष ठेवताना कांदाबीजाच्या व्यावसायिक उत्पादनाकडे दुर्लक्ष केले जाते. ही बाब लक्षात घेऊन श्री गणेश बचत गटातील महिलांनी कांदा बिजाची सामूहिक शेती करत अवघ्या सात महिन्यात दोन लाखाहून अधिक उत्पन्न कमाविण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन विकास व संशोधन प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ), खादी ग्रामोद्योग आयोग व नाशिक महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मदतीने या महिलांनी कांदा बीजाची ही सामूहिक शेती तिरडशेत येथे केली आहे. अडीच एकर क्षेत्रात केलेल्या शेतीतून ३ ते ३.५ क्विंटल कांदा बीज उत्पन्नातून दोन लाख १० हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. याशिवाय मधुमक्षिका पालन व शेवग्याची शेतीही केल्यामुळे उत्पन्नात भर पडणार आहे. स्त्री शक्ती लोक संचलित साधन केंद्राच्या आदिवासी उपयोजनेंतर्गत श्री गणेश महिला बचतगटाच्या महिलांनी कांदा बीज सामूहिक शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ‘एनएचआरडीएफ’ समवेत करार केल्यामुळे २५ क्विंटल कांदा बीज नि:शुल्क मिळाले. दुसरीकडे, गटातील महिलांकडे स्वत:ची जागा नसल्याने खादी ग्रामोद्योग आयोगाकडून २.५ एकर जमीन एकरी दहा हजार किरकोळ किंमतीत एक वर्षांसाठी भाडेतत्वावर घेण्यात आली. सामूहिक शेतीसाठी गटातील पाच महिलांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. गटाने प्राथमिक पातळीवर काम करताना बँकेकडून सुरूवातीला २५ हजाराचे कर्ज घेतले. त्यानंतर दोन लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेत शेळी व्यवसाय सुरू केला. मात्र या पलिकडे जाऊन काही तरी करावे, या उर्मीतून त्यांनी सामूहिक शेती करण्याचे ठरविले. गटातील पाच महिलांपैकी २ महिलांकडे अर्धा व एक एकर अशी शेती होती. उर्वरीत महिला शेतमजूर म्हणून काम करत होत्या. त्यांचे उदरनिर्वाहाचे माध्यम म्हणजे शेतीवर आधारीत मजुरी. त्यांचे हे कौशल्य लक्षात घेऊन ‘माविम’ने सामूहिक शेतीच्या निर्णयास पाठिंबा दिला. माविम, खादी ग्रामोद्योग आणि एनएचआरडीएफ यांच्या सहकार्याने तिरडशेत परिसरातील अडीच एकर जागेत कांदाबीज शेतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. शेतात पाणी देणे, खत फवारणी करणे, शेत तयार करणे, या कामात पतीराजांच्या सहकार्यामुळे फारशी अडचणी उद्भवल्या नाहीत. कांदाबीज शेतीसाठी आवश्यक ज्ञान अवगत व्हावे, म्हणून त्यांना कृषीविषयक शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात आले. बिजासाठी पोषक असलेल्या वातावरणात म्हणजे १२ ते १५ ऑक्टोबर. या काळात कांदाबीजाची लागवड करण्यात आली. वातावरणातील बदल लक्षात घेत त्या बरोबर शेवग्याचीही २१ झाडे लावण्यात आली. शेवगा तोडुन विकण्याची जबाबदारी खादी ग्रामोद्योग आयोगाने महिलांना दिली आहे. विक्रीतून ६० टक्के रक्कम महिलांना व ४० टक्के रक्कम खादी ग्रामोद्योग आयोगाला देण्यात येईल, असा करार संबंधितांमध्ये झाला आहे. या शिवाय, याच ठिकाणी मधुमक्षिका पालन करण्यासाठी तीन पेटय़ा ठेवण्यात आल्या आहेत. मधमाशांमुळे कांदा बीज उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे महिलांचे निरीक्षण आहे.
कृषी अधिकारी पिकांची पाहणी करून कशा प्रकारे काळजी घ्यायची, कोणती औषधे वापरायची या संदर्भात मार्गदर्शन करतात. कांदा बीजासाठी आत्तापर्यंत शेणखत, मजूर, वाहतूक, शेत तयार करणे व औषधे असा एकूण ९६ हजार ८०० रूपये खर्च झाला असून या माध्यमातून एकरी ३ ते ३.५ क्विंटल कांदा बीज मिळणार आहे. या बीजांची विक्री ३०० रुपये किलो होणार असून या सात क्विंटलसाठी महिलांना दोन लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. कांदा बीजाची काढणी एप्रिल महिन्यात झाल्यानंतर या जागेत घेवडा बीज उत्पादन किंवा भेंडी बीज उत्पादन करण्याचा महिलांचा मानस आहे. असे उपक्रम राबविताना सर्वात मोठे आव्हान असते ते, मालास बाजारपेठ मिळविण्याचे. परंतु, ‘एनएचआरडीएफ’द्वारे त्याची खरेदी होणार असल्यामुळे तो प्रश्नही सहजपणे मार्गी लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा