ऐरोली येथील श्रीराम विद्यालयात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून निर्माण झालेला तिढा, गुरुवारी पालकांच्या दे धक्क्य़ामुळे अखेर सुटला. मात्र आता या आंदोलनाचे श्रेय लाटण्यासाठी राजकीय नेत्यांची चढाओढ निर्माण झाली आहे. यातच शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी पालकांशी केलेली अरेरावी विरोधात पालकवर्गातून संताप व्यक्त होत आहे.
शालेय शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगारांची अंतरीम वाढ थकविल्याने संतप्त झालेल्या शिक्षक आणि पालकांनी मागील महिन्याभरापासून मोर्चा, निवेदने, कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला होता. पालक, शिक्षक आणि शालेय प्रशासन यांच्या संयुक्त बैठकींमध्ये हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शालेय प्रशासनाकडून मिळूनदेखील त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नव्हती. या विरोधात गुरुवारी शिक्षक आणि पालक संघटनेने साखळी उषोपणाची घोषणा केली होती. दरम्यान १२ आंदोलनकर्त्यां शिक्षकांवर कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
गुरुवारी या शिक्षकांना पालकांना शाळेच्या आत येणास तेथे नेमलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केल्याने, संतप्त पालकांनी त्यांना चोप देत शाळा प्रशासनाला धारेवर धरले होते. पालकांचे रौद्ररूप पाहता प्रशासनाने दुपारी शाळेचे संचालक सुबिर कुमार बॅनर्जी यांच्या सोबत पालक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लावली होती.
शालेय व्यवस्थापनाबरोबर चर्चा सुरू असताना पालक वर्गाने व्यवस्थापना विरोधात घोषणाबाजी केल्याने काही वेळ वातावरण तापले होते. पोलीसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी दाखल झाल्याने शाळेला छावणीचे स्वरूप आले होते. शिक्षक पालकांची चर्चा सुरु असताना या मुद्दय़ासाठी ऐरोलीतील सर्वच राजकीय पक्ष श्रेय घेण्यासाठी एकवटले होते.
ऐरवी शाळेच्या बाहेरून जाणाऱ्या राजकीय नेत्यांना ही शाळा दिसली नसली तरी आजच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय यांचे पदाधिकारी बॅनर्जी यांच्यासमवेत चर्चेला बसलेले दिसले. त्यामुळे शाळेची घंटा वाजण्याऐवजी श्रीराम विद्यालयाच्या शिक्षकांच्या वेतन हक्काच्या मुद्दय़ावर राजकीय घंटा मात्र वाजली. शिवसेनेचे नगरसेवक मनोज हळदणकर यांनी सुरक्षा रक्षकाला शिवसेना स्टाइलने मारहाण केल्यांनतर वातावरण तापल्याचा फायदा घेत ऐरवी कधीही न भेटणारे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले मात्र विजयाचे श्रेय घेण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते. शिक्षक-पालक व श्रीराम विद्यालयाचे संचालक बॅनर्जी यांच्यासमेवत चर्चा सुरू असताना चौगुले बैठकीच्या ठिकाणी घुसले. यानंतर तेथील पालकांशी अरेरावी करत त्यांना बाहेर पाठवले.
त्यांच्या या कृती मुळे मात्र पालकांमध्ये संशयकल्लोळ माजला होता. पालकांशी संवाद न साधता शिक्षण मंदिरातच पालकांशी केलेल्या अरेरावीमुळे पालकवर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. राजकीय नेते कसे असतात आणि जे नसतात ते कसे राजकारण करतात यांचा अनुभव मात्र या निमित्ताने तेथील पालकांना आला. या संदर्भात चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता, पालक आणि शिक्षकांचे सर्व प्रश्न मार्गी लागले असून कोणाची कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऐरोलीचे आमदार संदीप नाईक होते कुठे?
श्रीराम विद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात ऐरोली मतदारसंघात पालक वर्ग आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अनेकांच्या मदतीची वाट पाहत होता. असे असताना या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार संदीप नाईक मात्र एकदाही या ठिकाणी फिरकले नसल्याने आमदार आहेत कुठे असा प्रश्न या वेळी पालकांनी उपस्थित केला. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे निराधार नेतृत्व करणारे कार्यकर्ते मात्र तोंडघशी पडले होते.  

Story img Loader