ऐरोलीमधील श्रीराम विद्यालयाच्या प्रशासनाने शालेय शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना पगारवाढ न दिल्याने संतप्त झालेल्या शिक्षक आणि पालकांनी शालेय व्यवस्थापकांना घेराव घातला. पूर्ण पगार द्या आणि नियमित अंतरिम वाढ द्या अशी मागणी करीत शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्टीनंतर शुक्रवारी पहिल्याच दिवशी सुरू झालेली शाळा बंद पाडली.
श्रीराम विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमात ४४ शिक्षक विद्यादानाचे काम करतात. शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत या शाळेत हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. शालेय प्रशासनाने या शिक्षकांना शालेय शिक्षक कर्मचारी वेतन नियमानुसार किमान पगार देणे आणि वार्षिक अंतरिम वाढ देणे अनिवार्य आहे.
मात्र असे असताना शालेय प्रशासानाने शिक्षकांच्या पगारातून पीएफ व इतर रक्कम वजा करीत पगार दिला जातो, तर वर्षांकाठी शिक्षकांना अपक्षित असणारा व वेतनप्रणालीनुसार पगारवाढ देण्याऐवजी केवळ ३०० ते ५०० रुपयांची वाढ देऊन शालेय व्यवस्थापन शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसत आहे. इतकेच नाही तर येथे कार्यरत असणाऱ्या लिपिक आणि प्रयोगशाळेचे शिक्षक व इतर शिक्षकांना देखील जुन्या नियमावलीनुसार पगार दिला जातो. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी अनेकदा विचारणा केली असता व्यवस्थापनाने केवळ आश्वासनांवर त्यांची बोळवण केली. दरम्यान, दिवाळीच्या सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरू झाली असता शिक्षकांनी शालेय व्यवस्थापन समितीचे बी. आर. पाटील यांना घेराव घातला. जर शिक्षकांनी काम करून जर त्यांना मोबदला मिळत नसेल तर यापुढे आपण कठोर भूमिका घेऊ असे शिक्षक आणि पालक संघटनांनी व्यवस्थापनाला खडसावले. व्यवस्थापन समितीने शिक्षकांच्या मागण्या लेखी स्वरूपात देण्याचे सांगत हे प्रश्न चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तुटपुंज्या पगारात शिक्षकांनी उदरनिर्वाह करायचा कसा आणि शिक्षणासारखे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना आंदोलनाची वेळ येऊ नये अशी भूमिका पालक संघटनेच्या वतीने स्थानिक नगरसेवक मनोज हळदणकर यांनी व्यक्त केली, तर प्रशासनाने या प्रश्नी तोडगा न काढल्यास पालक संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशाराही हळदणकर यांनी दिला.