स्तनांच्या कर्करोगाने पीडित महिलांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या मैना फाउंडेशन या संस्थेतर्फे जनजागृतीकरिता ‘शुक्रतारा मंदवारा’ या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
श्रेष्ठ भावगीत गायक अरुण दाते, संगीतकार श्रीधर फडके आणि ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या दैवी प्रतिभेतून साकारलेला हा कार्यक्रम येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात येत्या शनिवारी (१८ जानेवारी) रात्री ८.३० वाजता सादर करण्यात येणार आहे.
जगात स्तनाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आणि त्यातही सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरात आहेत. एका अंदाजानुसार भारतात सर्वसाधारणपणे दहा टक्के, म्हणजे दहातील एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे हे प्रमाण सातत्याने वाढत चालले असून येत्या १५ वर्षांत ते दुप्पट होण्याचा धोका आहे. या विषयावर जागृती घडवून आणणे, कर्करोगाचे निदान व उपचार यांसाठी साह्य करणे अशा वेगवेगळय़ा पद्धतीने या समस्येशी सामना करण्याचा प्रयत्न मैना फाउंडेशन गेली ५-६ वर्षे सातत्याने करीत आहे.
मैना फाउंडेशनतर्फे आजवर नवी मुंबईतील कोपरखरणे येथील लायन्स सर्विस सेंटर, नागपूर येथील मातृ सेवा संघ महिला रुग्णालय आणि राजस्थानातील खिचन (फालोडी) येथील कलापुरम रुग्णालय येथे स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी मॅमोग्राफी केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच, फाउंडेशनतर्फे मुंबईतील टाटा स्मृती रुग्णालयातील गरजू रुग्णांसाठी आर्थिक मदतही देण्यात येते. येत्या काळात फिरते मॅमोग्राफी केंद्र, स्तनाच्या कर्करोग निदानासाठी सातत्यपूर्ण कार्यक्रम असे उपक्रम फाउंडेशनतर्फे करण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांकरिता आर्थिक मदत गोळा करण्यासाठी ‘शुक्रतारा मंदवारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : शंकर पंडित- ८०८०४३५४६३ अनघा हुन्नुरकर- ९९२०२०३५९६
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा