‘श्यामची आई’ या एकपात्री भावनाविष्काराचा एक हजार प्रयोग करणारे परभणीतील नाटय़कलावंत मधुकर उमरीकर येत्या ३० नोव्हेंबरला येथील नटराज रंगमंदिरात १००१वा प्रयोग सादर करणार आहेत.
साने गुरुजी यांच्या आईच्या संस्काराची महती कथन करणारा ‘श्यामची आई’ हा एकपात्री नाटय़प्रयोग गेली अनेक वर्षे येथील मधुकर उमरीकर करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी एक हजार प्रयोगांचे सादरीकरण केले. काही दिवसांपूर्वी पुणे येथे ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या उपस्थितीत हा प्रयोग सादर केला. आपला १००१वा प्रयोग येथील नटराज रंगमंदिरात दुपारी ३ वाजता सादर करणार आहेत.
क्रांती हुतात्मा प्रतिष्ठान व साने गुरुजी साहित्य अभ्यास मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून सिंधुताई सपकाळ, महापौर प्रताप देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सतीश जोशी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.     

Story img Loader