डॉक्टरांविषयीच्या तक्रारींची सभापतींकडून दखल
शहरात काही दिवसांपासून रिमझिम पावसामुळे साथीच्या आजारांचा फैलाव होत असून, स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे, या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली आहे. साथीच्या आजारांनी बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करावेत, रुग्णांना उत्तम सेवा देऊन त्यांच्यामध्ये पालिकेच्या दवाखान्यांबद्दल विश्वासार्हता निर्माण करावी, अशा सूचना स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी केल्या आहेत.
नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ावरून सभापतींनी हे आवाहन केले आहे. पालिका दवाखान्यांत सर्व यंत्रणा उपलब्ध असून, रुग्णांच्या डॉक्टरांविषयीच्या सेवेबद्दल अनेक तक्रारी येत असतात. त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींकडूनही या तक्रारी सभागृहात केल्या जातात. या सर्व पाश्र्वभूमीवर सभापती निमसे यांनी डॉक्टरांना ‘सेवा’ म्हणून कार्य करण्याचे बजावले.
शहरात उद्भवलेल्या साथीचे आजार व स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश सभापती निमसे यांनी दिले आहेत. दूषित पाण्यामुळे होणारे जलजन्य आजार आणि स्वाइन फ्लूबाधित रुग्णांवर उपचारासाठी पालिकेच्या कथडा, सिव्हिल यांसह मविप्र रुग्णालयात स्वतंत्र ‘अतिदक्षता विभाग’ सुरू करण्यात आल्याची माहिती निमसे यांनी दिली. साथींच्या पाश्र्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत महापालिका दवाखान्यांतील सर्व डॉक्टर, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, गटनेते लक्ष्मण जायभावे आदी उपस्थित होते.
साथीचे आजार आणि स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबरोबरच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घ्यावयाची काळजी, याविषयी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येईल. एप्रिलपासून शहरातील ९७३ स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ६६० रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्यातील ११ रुग्णांचे नमुने ‘पॉझिटिव्ह’ आढळले असून त्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाचे डॉ. डी. बी. पाटील यांनी दिली. गेल्यावर्षी या कालावधीत २४ रुग्ण बाधित होते. गतवर्षांच्या तुलनेत यंदा स्वाइन फ्लूच्या विषाणूंची तीव्रता अधिक असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी तोंडावर रुमाल ठेवणे तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखण्याचे आवाहन पाटील यांनी केले. डॉ. गरुड यांनी साथरोग व स्वाइन फ्लूबाधित रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक औषधपुरवठा असल्याचे नमूद केले. डॉ. निकम यांनी या रुग्णांवर उपचार करण्याचे प्रशिक्षण डॉक्टरांना दिल्याचे सांगितले. तसेच डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यात येईल, असेही ते म्हणाले. डॉ. गावित यांनी स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांवर अधिक वेळ वाया न दवडता त्वरित उपचाराची गरज असल्याचे नमूद करीत रुग्णांनी खासगी रुग्णालयात योग्य प्रतिसाद मिळत नसल्यास पालिका रुग्णालयांत उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन केले. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कावीळ, विषमज्वर, गॅस्ट्रो या साथीच्या आजारांनी बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच डेंग्यू व मलेरियाचेही रुग्ण वाढले आहेत.
या पाश्र्वभूमीवर, सार्वजनिक ठिकाणी उघडय़ावरील पाण्याच्या डबक्यांची पाहणी करून ती नष्ट करण्यात येतील, झोपडपट्टय़ांमध्ये स्वच्छता राखली जाईल, नागरिकांमध्ये साथीच्या आजारांविषयी जनजागृत्ती मोहीम राबविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा