प्रीमियर ज्वेलर म्हणून जगभरात ख्यात असलेली बहुराष्ट्रीय टिफानी अँड कंपनी महाराष्ट्रात १०० कोटींची गुंतवणूक असलेला हिरे घडणावळ/प्रक्रिया प्रकल्प उभारणार असून यासाठी नागपुरातील मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील जागा अधिग्रहित करण्यात येणार आहे. टिफानी अँड कंपनीची ही भारतातील सर्वात मोठी व पहिलीच मोठी गुंतवणूक राहील. हिरे घडणावळीचा प्रकल्प विदर्भात पहिल्यांदाच प्रवेशणार असल्याने दागिने आणि हिरे व्यवसायातील हजारोंना रोजगाराचा नवा मार्ग खुला होण्याची संधी चालून येणार आहे. एमएडीसीचे वरिष्ठ विपणन व्यवस्थापक एस. सीतारसू यांनी या घडामोडींना दुजोरा दिला आहे.
सुमारे ४ हजार ३५४ हेक्टरावर पसरलेल्या मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळाच्या (मिहान) च्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ)च्या दोन लाख चौरस फुटांवर या प्रकल्पाची उभारणी होणार असल्याचे वृत्त आहे. यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) विशेष प्रकल्प विकासक म्हणून भूमिका बजावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात एमएडीसीचे वरिष्ठ विपणन व्यवस्थापक एस. सीतारसू यांनी दिलेल्या माहितीनुसार एमएडीसीच्या अधिकाऱ्यांची टिफानी अँड कंपनीच्या व्यवस्थापनाशी प्रकल्पाबाबत दीर्घकाळ चर्चा झाली असून प्रकल्पासाठी जागेची पाहणी आणि निवड करण्यात आली आहे. पुढील वर्षीच्या प्रारंभी टिफानी कंपनीच्या प्रकल्प उभारणीची कोनशिला रचली जाऊन लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार टिफानी अँड कंपनी विमानांमार्फत हिऱ्यांची नागपुरात आयात करून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम मिहानमधील प्रकल्पात करणार आहे. घडणावळीचे काम अत्यंत क्लिष्ट असून हिऱ्यांची सर्वात मोठी बाजारपेठ गुजरात राज्यातील सुरत शहरात आहे. सुरत हे जगभरात हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी ख्यात असताना कंपनीने नागपूर शहराची निवड प्रकल्पासाठी केल्याने विदर्भातील जवाहिऱ्यांना आता नवे काम मिळण्याची शक्यता आहे. नागपुरात प्रक्रिया होऊन घडलेले हिरे जहाजांमधून जगभरातील विविध देशांमध्ये पाठविले जातील, असेही समजते. टिफानी कंपनीच्या प्रकल्पाची सुरक्षितता आणि मालाची सुरक्षा याबाबत चाचपणी केली जात आहे. एमएडीसीने टिफानीला पूर्ण सुरक्षेची ग्वाही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिहान प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी उभारणीचे काम संथगतीने होत असल्याने प्रकल्पाच्या पूर्णत्वास जाण्याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. नागपूर शहर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने शहराची मिहान प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. नागपूर शहरावरून अमेरिका आणि युरोपीय देशांना जाणारी अनेक विमाने जातात. या विमानांसाठी नागपूर हे आंतरराष्ट्रीय थांबा आणि उड्डाणाचे एक केंद्र म्हणून विकसित केले जाणार असून येथून दक्षिण-पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलियालाही विमाने जातील, असा गाजावाजा करण्यात आला आहे. मिहानचे काम पूर्ण झाल्यानंतर सेझमधील औद्योगिक कारखान्यांमध्ये तयार झालेला माल कार्गो हबमध्ये येणाऱ्या विमानांमध्ये लोड केला जाईल, असेही स्वप्न दाखविण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा