आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, तसेच देशभरातून शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने शिर्डी-मनमाड-नाशिक अशी पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत डीआरयूसीसी समितीचे सदस्य नितीन पांडे यांनी केली होती. या मागणीच्या प्रस्तावावर चर्चा होऊन हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे मुख्यालयास पाठविण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात शिर्डी-मनमाड-नाशिक अशी रेल्वे पॅसेंजर सेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.
भुसावळ विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक भुसावळ येथे झाली. बैठकीस प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार आगामी काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक येणार आहेत. तसेच वर्षभर शिर्डी या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्रात दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. गेल्या काही वर्षांत डिझेल व पेट्रोलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे खासगी वाहन किंवा एसटी बसचा प्रवासही मोठय़ा प्रमाणावर महागला आहे. भाविकांना रेल्वे मार्गाने स्वस्तात शिर्डी प्रवास उपलब्ध व्हावा तसेच प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन पांडे यांनी खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी-मनमाड-नाशिक रेल्वे पॅसेंजरचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला होता. विभागिय रेल्वे प्रबंधकांनी प्रस्तावावर चर्चा करून तो मंजुरीसाठी रेल्वे मुख्यालयाकडे पाठविण्यात येत असल्याचे सांगितले.
रेल्वे प्रशासनातर्फे विद्यार्थी, महिला, शेतकरी, डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक, अपंग, आजारी रुग्ण, कलाकार, खेळाडू, बेरोजगार आणि शासनाधिकृत पत्रकार यांना रेल्वे तिकीट प्रवासात विविध सोयी दिल्या आहेत. परंतु, रेल्वेच्या तिकीट व आरक्षण कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना अपुरी माहिती असते. त्यामुळे ते अशा प्रवाशांना तिकीट अथवा आरक्षण सवलतीस पात्र असतानाही वंचित ठेवतात, अशा तक्रारी आहेत. हा प्रश्नही पांडे यांनी उपस्थित केला होता. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन सर्व रेल्वे स्थानकांवर तिकीट आरक्षण कार्यालयाजवळ उपरोक्त सवलतींबाबत माहिती फलक लावण्याचे आदेश संबंधित वाणिज्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बाबत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाईल, असे आश्वासन मंडल रेल प्रबंधकांनी दिले.
महेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उत्तर महाराष्ट्रातील खासदार व समिती सदस्यांनी रेल्वे प्रवासासंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले. बैठकीचे संयोजन आणि सूत्रसंचालन मंडल वाणिज्य प्रबंधक एन. जी. बोरकर यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा