*  नागपूरचे खासदार निष्क्रिय – संदीप जोशी
* गडकरींचे भूमिपूजन मुत्तेमवारांच्या मेहनतीवर झ्र् ठाकरे
खासदार विलास मुत्तेमवार यांनी शहराच्या भल्यासाठी प्रयत्न केले नसून, गेल्या पाच वर्षांत त्यांनी काहीच केले नाही, असा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी यांनी केला आहे. तर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे भूमिपूजनाचे कार्यक्रम विलास मुत्तेमवार यांच्या मेहनतीच्या आधारावर चालतात, असा प्रत्यारोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी केल्याने नागपुरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली
आहे.
खासदार म्हणून नागपूरच्या जनतेने निवडून दिल्यापासून विलास मुत्तेमवार निष्क्रिय आहेत. नागपुरात त्यांचा मुक्काम कधी असतो हे जनतेला कळत नाही. त्यांनी नागपुरात कोणताही प्रकल्प आणण्याचे प्रयत्न केले नाहीत. फक्त लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे ते सक्रिय झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत नागपूर शहराला विशेष अनुदानाचा एक रुपयाही मिळाला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नागपूरच्या विकासाकरता दरवर्षी २५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्या हिशेबाने गेल्या १० वर्षांत नागपूरचे देणे असलेले जवळजवळ २५० कोटी रुपये सरकारने अद्यापही दिलेले नाहीत, असा आरोप करून संदीप जोशी यांनी काँग्रेसला डिवचले असून यातून नागपुरात राजकीय संघर्षांला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नागपूर शहरातून जाणारे राज्य महामार्ग आणि एकात्मिक विकास योजनेतील रस्त्यांसह काही मोठे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) आहेत. हा विभाग रस्ते तयार करून मोकळा झाला, परंतु त्यांच्या दुरुस्तीवर लक्ष देण्यात येत नाही. दुरुस्तीसाठी निधीही उपलब्ध करून दिला जात नाही. याची सर्व जबाबदार महापालिकेवर टाकण्यात आली आहे. सिमेंटचे रस्ते तयार करण्यातही सरकार अडथळे आणत आहे. मेयो आणि मेडिकलच्या विकासाचा आराखडाही फक्त कागदावरच आहे. राज्य सरकारने आधी उपराजधानीचा विकास करावा, मग ‘विदर्भ अ‍ॅडव्हांटेज’चे आयोजन करावे असा सल्ला जोशी यांनी दिला आहे.
विलास मुत्तेमवार यांचे कट्टर समर्थक व महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी संदीप जोशींना प्रत्युत्तर देताना थेट भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरच तोफ डागली आहे. शहराचा विकास केंद्र व राज्य सरकारच्या भरवशावर होत असून, खासदार विलास मुत्तेमवार यांच्या मेहनतीच्या आधारावर नितीन गडकरी हे भूमिपूजनाचे कार्यक्रम करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. केंद्र व राज्य सरकार महापालिकेला निधी देत नसल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी यांनी केला होता. त्याचा समाचार घेताना ठाकरे यांनी शहराच्या विकास कामासाठी केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या निधीची यादी सादर केली. काँग्रेस सरकारनेच शहराचा विकास केल्याचा दावा करून ते म्हणाले की, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामुळेच शहरात आयआरडीपीचे रस्ते तयार झाले. येथे मोठय़ा प्रमाणावर रोजगार आला. सोबतच खासदार मुत्तेमवार यांच्या प्रयत्नाने शहराला अनेक योजना मिळाल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून आम्ही त्यांना शहराच्या अनेक समस्यांची माहिती दिली. खरेतर हे महापालिकेच्या सत्तारूढ पक्षाचे काम आहे, पण ते घोटाळे करण्यातच गुंतलेले आहेत असा टोला ठाकरे यांनी
लगावला.

Story img Loader