शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या संख्येत ग्रामीण भागात लक्षणीय घट निर्माण झाल्यामुळे मजुरांसाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतीच्या मशागतीची वेळ आहे. उन्हाळ्यात नांगरणी, वखरणी करून शेतातील केरकचरा जाळून पुढील खरीप हंगामासाठी शेत तयार करणे सुरू झाले आहे. शेतातील कामांसाठी आता मजूर मिळत नसल्यामुळे शेती कशी करायची असा पेच शेतकऱ्यांसमोर निर्माण झाल्याचे चित्र ग्रामीण भागातील विविध तालुक्यात दिसून येत आहे.
गुढीपाडव्यापासून शेतीच्या उन्हाळी मशागतीला सुरुवात केली जाते. पाडव्यानंतर दोन महिन्यात पावसाला सुरुवात होते. नांगरणी, वखरणी, काडी कचरा वेचणे, गुरे, शेळ्या, मेंढय़ा बसवून शेत खतवणे, अशी कामे सुरू असतात. आता शेतमजूर मिळणे दुरापास्त झाल्याने शेतीच्या मशागतीची बहुंताशी कामे बैल व मजुरांऐवजी ट्रॅक्टरने केली जात आहेत. बैलांच्या वाढलेल्या किमती आणि मजुरीचे दर याचा हिशेब केला तर ते परवडणारे नसल्याने शेती व्यवसायावर परिणाम होत आहे. मजूरच मिळत नसल्याने शेतक ऱ्यांनी ट्रॅक्टरने मशागत व पेरणी करणे पसंत केले आहे.
दिवसाकाठी पुरुष मजुरांना १५० ते २०० रुपये आणि महिला मजुरांना १०० ते १२५ रुपये द्यावे लागते. मजुरांच्या इच्छेनुसार काम करण्याच्या वेळा असतात. कळमेश्वर, काटोल, रामटेक, कुही मांढळ या परिसरात औद्योगिक वसाहत असल्यामुळे तेथील कारखान्यात दिवसाकाठी कामासाठी १०० रुपये मिळत असले तरी तेथे काम करण्यास मजूर तयार असतात. उन्हाच्या झळा सहन करून शेतात कामे करावी लगत असल्याने मजूर कामासाठी तयार होत नाही. त्यामुळे मोजकेच शेतात काम करणारे असतात. गुरांचा चारा, शेण गोळा करण्यासारखी कामे शेतकऱ्यांला करावी लागतात. शेतीची महागडी बी-बियाणे खरेदी केल्यानंतर पेरणी करून जर पावसाने दगा दिल्यास किंवा वातावरणातील बदलामुळे अथवा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मावळत्या खरीप व रब्बी हंगामात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भावही मिळत नाही. शेतकामासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी आपापल्या कुटुंबातील महिला व मुलांना शाळेच्या सुटय़ा लागल्याने त्यांच्याकडूनच ही कामे करून घेत आहे. मजुरांची समस्या, नैसर्गिक संकट, नापिकी यामुळे योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यांची लुबाडणूक होत असल्याने शेती विकून एखादा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणे पसंत करतो.
शेतमजुरांच्या संख्येत लक्षणीय घट
शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या संख्येत ग्रामीण भागात लक्षणीय घट निर्माण झाल्यामुळे मजुरांसाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू झाली आहे.
आणखी वाचा
First published on: 19-04-2014 at 03:58 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Significant drop in the number of farm labor