महापालिकेत रोज रस्त्यांवरील खड्डय़ांची कोणी ना कोणी चर्चा करतो. या प्रश्नी आंदोलनेही झाली. खड्डय़ांवरून राजकारणही चांगलेच तापले. मात्र, गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत खड्डय़ांबाबत नगरसेवकांनी तसे मौनच पाळले! एका नगरसेविकेने खड्डय़ांचा प्रश्न उचलला खरा, पण त्यावर कोणी बोललेच नाही. वॉर्डात कामासाठी निधी दिला जात नाही, हाच विषय केंद्रस्थानी होता. दुसरीकडे मनपात नगरसेवकांनी मौन बाळगले, तरी खड्डय़ांची चर्चा थेट नगरविकास राज्यमंत्र्यांनी जाहीर भाषणात केली.
एका कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यमंत्री उदय सामंत यांनी शहरातील रस्ते व खड्डे दुरुस्तीस निधी देऊ, असे आवर्जून सांगितले. विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांचा सत्कार राष्ट्रवादी भवन येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमास आलेल्या मंत्री सामंत यांना रस्त्यांची व खड्डय़ांची इत्थंभूत माहिती देण्यात आली. सत्कारप्रसंगी खड्डय़ांवर भाष्य करताना ते म्हणाले की, मनपाचे अंदाजपत्रकच आकडय़ांनी फुगवले जात आहे. ज्या महापालिकेकडे आवक नाही, तेथे ९०० कोटींचे अंदाजपत्रक सादर करताना २७५ कोटी सरकारकडून मिळतील, असे दाखविले जाते. राज्यात अशा पद्धतीचे अंदाजपत्रक कोठेच होत नाही. ज्यांना गेल्या वर्षीचीच कामे पूर्ण करता आली नाहीत, त्यांच्याकडून रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवण्याची अपेक्षा कशी करता येईल?
सामंतांच्या भाषणापूर्वी आमदार मुंडे यांनीही शहरातील खड्डय़ांचा एक किस्सा रंगवून सांगितला- परळीतील एक कुटुंब मुकुंदवाडीत राहते. ते गावी परतले. नवरा-बायकोत भांडण झाले होते. ते विकोपाला गेल्याने सोडवायला लोकप्रतिनिधी या नात्याने मला बोलाविले. प्रश्न जाणून घेतला आणि तो मोठा भयंकर होता. तुमच्या शहरातील रस्ते एवढे खराब आहेत की, खड्डय़ातून दुचाकी गेली नि बायको गाडीवरून पडली. नवऱ्याला कळलेच नाही. त्यामुळे भांडण विकोपाला गेले!
शहरासाठी निधीची गरज आहे, तो निधी द्यावा, अशी मागणी आमदार मुंडे यांनी सामंत यांच्याकडे केली. तो धागा पकडत सामंत यांनी शहरासाठी निधी देऊ, असे सांगितले. किमान गाडीवरून कोणी पडणार नाही, असे रस्ते तरी बनविले जातील, अशी पुस्ती जोडली. विविध आंदोलनानंतर रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत सर्वसाधारण सभेत घमासान चर्चा होईल, असे वातावरण होते. मात्र, नगरसेवकांनी यावर मौनच बाळगले.
खड्डय़ांवर नगरसेवकांचे ‘मौन’, मंत्र्यांकडून मात्र सूचक भाष्य!
महापालिकेत रोज रस्त्यांवरील खड्डय़ांची कोणी ना कोणी चर्चा करतो. या प्रश्नी आंदोलनेही झाली. खड्डय़ांवरून राजकारणही चांगलेच तापले. मात्र, गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत खड्डय़ांबाबत नगरसेवकांनी तसे मौनच पाळले!
First published on: 27-09-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silence of corporator on pothole comment clue by minister