यशवंत देव यांची ओळख कवी-संगीतकार-गायक एवढय़ापुरती मर्यादित नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची आध्यात्मिक वृत्ती! आचार्य रजनीश अर्थात ओशो यांच्या परिवारात सामील झाल्यानंतर जगण्याचा दृष्टिकोन बदलून गेला असं ते सांगतात. यातूनच साकारली ‘समाधी की झंकार’ ही ध्वनिफीत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या या ध्वनिफितीची निर्मिती युनिव्हर्सल म्युझिकने केली आहे तर देव यांचे परमभक्त असणाऱ्या सुनील कानडे यांनी ती प्रस्तुत केली आहे. यात ओशो महिम्याची तब्बल २३ गीते असून गीत-संगीत-गायन ‘सबकुछ’ यशवंत देव आहे. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी घडविलेला हा आविष्कार थक्क करणारा आहे. यानिमित्ताने देव यांनी खास ‘रविवार वृत्तान्त’शी संवाद साधला.
नागपूर आकाशवाणीत कार्यरत असताना १९७०मध्ये मी प्रथम ओशो यांचे प्रवचन ऐकले आणि प्रभावित झालो. ‘ध्यानधारणा करा आणि स्वत:च अनुभूती घ्या, येणाऱ्या क्षणांना सामोरे जा,’ असा त्यांनी दिलेला संदेश मौल्यवान ठरला. त्यानंतर त्यांची पुस्तके वाचण्याचा सपाटाच मी लावला. मात्र माझा खरा भाग्ययोग ठरला तो २६ सप्टेंबर १९८१ या दिवशी. तेव्हा त्यांची मुंबईत प्रवचने सुरू होती. ‘प्रवचनाच्या आधी गाणं सादर करायला या,’ असा संदेश त्यांच्याकडून आला आणि कमालीचे दडपण आले. परमज्ञानी असणाऱ्या ओशोंना मीरा, कबीर, बुद्ध यांपैकी काही ऐकवणे म्हणजे वेडेपणाच. त्यामुळे स्वरचितच काहीतरी सादर करावं, असं ठरवलं आणि लिहिता झालो.
‘पाप हमारे, करुणा तेरी इन दोनों का अंत नही,
होश तेरा बेहोशी अपनी, इन दोनों का अंत नही’ असं गीत लिहिलं, त्याला चालही लावली आणि त्यांच्यासमोर सादर केलं! त्यांना ते आवडलं असावं, कारण त्यांनी मला सांगितलं, ‘संगीतसाधना हीच तुझी ध्यानधारणा आहे, मुक्तपणे आणि कोणत्याही कारणाशिवाय गा, तू योग्य मार्गावर आहेस!’ मी भरून पावलो. आजवरची सर्व क्वालिफिकेशन्स ओशोंच्या या प्रशस्तीपुढे फिकी ठरली.
यानंतरही त्यांच्या प्रवचनापूर्वी गाण्याची अनकेदा संधी मिळाली आणि ‘नींद ये कितनी गहरी है, हमने तो केवल करवट बदली, बेहोशी तो जारी है,’ अशा रचना करत गेलो. हिंदीतील या रचना माझ्या आतून आपोआप येत गेल्या. कालांतराने मराठी रुबायाही लिहू लागलो. त्यापूर्वी मी अनेक भावगीतं लिहिली होती, मात्र त्या आणि या रचनांमध्ये महत्त्वाचा फरक होता तो अनुभूतीचा. ओशोंचे विचार, ध्यानधारणा या साऱ्याचा परिपाक म्हणजे माझ्या या नव्या रचना होत्या. या शब्दांना ओशोंनीच अर्थ दिला. म्हणून ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी
‘मज स्फुरले जे जे लिहून झाले आहे,
मनी आनंदाचे फूल उमलले आहे,
मी तुझ्याच चरणी अर्पण करतो त्याला,
ही तुझीच किमया तुझीच करूणा आहे’ असं लिहिलं. या रचनांचं खूप कौतुक केलं जातं, मात्र हे सारं अनुभूतीतूनच आलं आहे.
‘तुमच्यानंतर आमचं काय होणार’, असा प्रश्न सर्वजण ओशोंना विचारत असत. यावर त्यांचं उत्तर असे, ‘मी कुठेही जाणार नाही, मी इथंच असेन, ध्यानाची परिसीमा गाठलीत की माझं अस्तित्व तुम्हाला जाणवेलच’. त्यांचे हे विचार ध्यानात ठेवल्याने त्यांच्या निर्वाणानंतर मी तेथे धाव घेतली नाही. त्या वेळीही माझ्या भावना मी शब्दांतून व्यक्त केल्या.
 ‘ओशो गए कहाँ है, ओशो अभी यहा हैं,
सूरज जरा क्षितिजके, उसपार जा खडम है’ असं लिहून मोकळा झालो. या प्रकारे शब्दांचा आधार घ्यावा लागत असला तरी शब्दांपेक्षा मौनातच खरा अर्थ आहे, हेही मी ओशोंकडून शिकलो. आपण इतकं बोलतो, या शब्दांना आकार आहेत, मात्र मौन निराकार असल्यानेच या आकारांचं अस्तित्व आहे. ज्यानं हे सारं निर्माण केलं तो स्वत: निराकार असल्यानेच गणपती, मारुती असा कोणताही आकार घेऊ शकतो. म्हणूनच प्रयोगशील असण्यासाठी मौनात असणं आवश्यक आहे, हे मला उमगलं.
याच जाणिवेतून या नव्या ध्वनिफितीची निर्मिती झाली आहे. आजवर एवढी गाणी केली असल्याने आयुष्याच्या या टप्प्यावर मला काही भव्यदिव्य करायचं नव्हतं. परंतु, कानडेंना ओशोंकडून प्रेरणा मिळाली असावी आणि ही ध्वनिफीत आली. ही गाणी गाण्यासाठी बडय़ा गायकांना घ्या, अशी सूचना काही कॅसेट कंपन्यांनी केली. मात्र ओशोंशी संबंधित नसणारं कोणीही मला नको होतं. म्हणूनच ही गीतं मीच गायली. यात ओशोमहिमा आहेच, शिवाय मौनाचं महत्त्वही मी उलगडलं आहे.
‘मौन महाशांती का सही द्वार है,
मौन महाक्रांती का आधार है,
मौन की गहराई में शास्त्रों के मोती,
शब्द अधुरे हो तो मौन करे पूर्ती,
मौनही समाधी की झंकार है! अशी रचना मी करू शकलो. ही सर्व गीते लिहितानाच त्यांना चाली सुचत गेल्या!
ओशोंवर नेहमीच बरं-वाईट बोललं जात, उलटसुलट चर्चा होते. गमतीचा भाग म्हणजे त्यांचे टीकाकार ओशोंनी काय लिहिलं आहे, हे कधीच वाचत नाहीत. त्यांच्याविषयी काय लिहून आलं आहे हे वाचतात आणि आपलं मत ठरवतात. या सर्व प्रकारातही मौन उपयोगी पडतं. ‘मौनम् सर्वार्थ साधनम्!’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा