पुढील वर्षांत येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासकीय पातळीवरून सुरू असतानाच शहरातील विविध संस्था, संघटनांकडूनही त्यास बळ मिळत आहे. शाळा, महाविद्यालयेही यात मागे नसून कुंभमेळ्याविषयी विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कुठे ‘हरितकुंभ’ तर कुठे चर्चासत्र होत आहे.
पांडे विद्यालयात ‘हरितकुंभ’ शपथ
नाशिकरोड येथील साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चेहडी बुद्रुक येथील एस. के. पांडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हरितकुंभविषयक शपथ घेण्यात आली. या समारंभाचे आयोजन विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना आणि स्काऊट गाईड विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. प्रास्तविक राष्ट्रीय हरित सेनेचे उपाध्यक्ष भगिरथ घोटेकर यांनी केले. त्यांनी हरितकुंभ संकल्पना पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने किती आवश्यक आहे याविषयी माहिती दिली. प्राचार्या अलका एकबोटे यांनी हरितकुंभाची शपथ दिली. पालक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील, सदस्य अण्णासाहेब ताजनपुरे यांच्या हस्ते हरितकुंभ बोधचिन्ह फलकाचे अनावरण करण्यात आले. प्राचार्या एकबोटे यांनी हरितकुंभ उपक्रमाव्दारे आयोजित विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. पर्यावरण विभाग प्रमुख मनोहर भोर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रुख्म्णिी जाधव यांनी केले.
सपकाळ महाविद्यालयात चर्चासत्र
शहरातील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित के. आर. सपकाळ कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत ‘कुंभमेळा-२०१५ मॅनेजमेंट ऑपरच्युनिटीज् अॅण्ड चॅलेंजेस’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र झाले. चर्चासत्राचे उद्घाटन मक्र्युरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत चौधरी यांच्या हस्ते झाले. चौधरी यांनी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळ्याचे महत्व मांडले. आपत्ती, गर्दी, माहिती सुरक्षा व संरक्षण, सुविधा यांचे व्यवस्थापन या विषयावर त्यांनी भर दिला. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना थेट कुंभमेळ्यात एखाद्या प्रकल्पाव्दारे व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या व्यावसायिक संधीचा व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून विचार करून लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी कुंभमेळ्यात सेवाभावी कार्य करावे. त्यसाठी लागणारी सर्व मदत सपकाळ नॉलेज हबतर्फे देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. समारोपात श्रीशंकराचार्य न्यासचे अध्यक्ष न्राजाभाऊ मोगल यांनी कुंभमेळ्याची पाश्र्वभूमी, वैशिष्टय़े व ऐतिहासिक महत्व मांडले. संशोधकांनी शोधनिबंध सादर केले.
चुंचाळे शाळांमध्ये हरितकुंभ शपथ
चुंचाळे येथील महापालिका शाळा क्र. २८ व १०० या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे ‘हरित कुंभमेळा १५-१६’ अंतर्गत राजेंद्र वाघ यांनी हरितकुंभ शपथ दिली. मुख्याध्यापक अर्जुन राजभोज यांनी हरितकुंभ उपक्रमाचे महत्व स्पष्ट करून स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, प्रदूषणविरहित गोदावरी, प्रदूषणविरहित नाशिक आदी संकल्पना कृतीत उतरविण्याचे आवाहन केले. आभार शोभा ठाकरे यांनी मानले.
स्वच्छ भारत अभियान : कुठे हरितकुंभ शपथ, तर कुठे कुंभमेळ्यावर चर्चासत्र
पुढील वर्षांत येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासकीय पातळीवरून सुरू असतानाच शहरातील विविध संस्था, संघटनांकडूनही त्यास बळ मिळत आहे.
First published on: 03-10-2014 at 01:53 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Simhastha kumbh mela preparations begin at administrative level