नगर जिल्हय़ातील भिंगार येथून दीड महिन्यांपूर्वी चालत निघालेली पालखी रविवारी सायंकाळी ७ वाजता परंपरागत माग्रे तुळजापूरच्या उत्तरेकडील डोंगरमार्गाने शुक्रवार पेठ येथे दाखल झाली. उशिरा रात्री भाविक मंदिरात दाखल झाले. पहाटेच्या सूर्यकिरणांच्या साक्षीने तुळजाभवानी मंदिरात सीमोल्लंघन सोहळा पार पडला. यावेळी ४० हजारांवर भाविकांची उपस्थिती होती.
मूळ स्थानापासून पलंग व पालखी वाजतगाजत जल्लोषात कने गल्ली, शुक्रवारपेठ, पावणारा गणपती चौक, आर्य चौक माग्रे तुळजाभवानी मंदिरात मार्गस्थ झाली. रात्री १ वाजता राजा कंपनी चौकात तर ३ वाजता आर्य चौकात पलंग पालखी आल्यानंतर हजारो सुवासिनींनी ओवाळून दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी तसेच शहरवासीयांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. पहाटे ४ वाजता पालखी मंदिरात आली. मंदिरातील सीमोल्लंघन पटांगणावर पालखी टेकविण्यात आली. दरम्यान गाभाऱ्यात महंत चिलोजीबुवा व महंत तुकोजीबुवा यांच्यासह भोपे पुजारी किसन परमेश्वर, संजय कदम, सुधीर कदम, अविनाश मलबा, विकास मलबा, विकास परमेश्वर, संजय परमेश्वर, प्रमोद परमेश्वर, अमर परमेश्वर, बाबासाहेब मलबा, दिलीप कदम, शशिकांत पाटील आदींसह इतरांनी १०८ साडय़ांचे िदड भवानीमातेच्या मूर्तीला गुंडाळले. देवीचा चेहरा वगळता सर्व भाग साडय़ांच्या वेष्टणाने संरक्षित करून ती मूर्ती नगरहून आलेल्या पालखीत बसविण्यात आली. त्यानंतर ती पालखी विधिवत सीमोल्लंघन पटांगणावर आणण्यात आली. पहाटे पाच वाजता देवीच्या सीमोल्लंघन सोहळ्याला सुरुवात झाली व ६ वाजून २० मिनिटांनी सोहळा संपन्न झाला. मंदिरात खाली व वरच्या बाजूंनी भाविकांनी सीमोल्लंघनप्रसंगी कुंकवाची उधळण केली. आई राजा उदेच्या गजरात राजाभाऊ गोंधळी, गणेश रसाळ व इतर गोंधळ्यांनी गगनभेदी संबळ वाजवून वातावरण निर्मिती केली. या सोहळ्यास जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे व जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील उपस्थित होते. नगरच्या मानकऱ्यांचा जिल्हाधिकारी यांनी सत्कार केला.
पालखीच्या स्वागतासाठी राजे संभाजी मंडळाच्या वतीने संस्कार भारतीची आकर्षक रांगोळी सतीश महामुनी, लक्ष्मीकांत सुलाखे, राजाभाऊ वाघ, प्रफुल्लकुमार शेटे, सुधीर महामुनी आदींनी काढली होती.

Story img Loader