‘सुखपारा’ हा स्वाती सुरंगळीकर यांचा तिसरा कवितासंग्रह. त्यांनी कथन केलेल्या मनोगतात ‘मनातल्या शब्दसरी’, ‘असं जगणं मोलाचं’ हे त्यांचे दोन कवितासंग्रह, तर ‘बकुळ’ हा चारोळी संग्रहही त्यांच्या नावावर जमा आहे. याशिवाय, ‘प्रांजली’ ही काव्यवाचनाच्या ध्वनीफितीचे केंद्रीय नभोवाणी मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री वसंत साठे यांनी प्रकाशन केले होते. यावरून सुरंगळीकर या कवितेच्या क्षेत्रात किती लोकप्रिय कवयित्री आहेत, हे लक्षात येते. ई.टी.व्ही., पुणे फेस्टिव्हल, विदर्भ साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथेही त्यांची वर्णी लागली आहे. इंग्रजी, हिंदी, गुजराती या भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कविता अनुवादित झाल्या आहेत. वृत्तपत्र, टी.व्ही., रेडिओ व इंटरनेट या माध्यमांमध्येही नागपूर, पुणे व सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथेही त्यांच्या कविता प्रसारित झाल्या आहेत.
आज मराठी साहित्य विश्वात सर्वात जास्त कविता लिहिली जात आहे. उठसूठ कविता लिहिली जाते. प्रत्येक माणसाचं पहिलं निर्मितीक्षेत्र हे कविता असते. अभिरुची व व्यासंग वृत्तपत्रीय काव्यलेखनातून सहज जाणवते. स्वाती सुरंगळीकर यांची कविता अशीच आहे. त्यांची कविता लडीवाळ, संवादी आहे. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना काव्यसाक्षात्कार झाला. त्या विज्ञान शाखेच्या अभ्यासक असल्याने ‘चुटकुल्यातील कविता’ त्यांना बरी वाटली व त्यात त्या रमत गेल्या. कवितासदृश्य कविता त्या लिहित गेल्या. त्या वृत्तपत्रात व अन्य माध्यमात प्रकाशित झाल्या. त्यांचा आवाज गोड असल्याने, गाऊन म्हटल्याने त्या लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाल्या, हे त्यांच्या मनोगतावरून लक्षात येते. ‘ट’ ला ‘ट’, ‘री’ ला‘री’ जुळवून कदाचित लोकप्रिय होता येईल, पण संस्कृत मीमांसकांनी सांगितलेली काव्याची प्रयोजने कशासाठी? साहित्याचे आकलन, कलाकृतीचे योगदान, वाङ्मयीन मूल्ये तपासलीच पाहिजे, हा आग्रह व्यर्थ ठरतो.
आशय हाच खरा? तर प्रतिभेचा अट्टाहास कशासाठी? स्वाती सुरंगळीकर यांची कविता मर्ढेकर, बोरकर, भट व महानोर यांच्या वाटेने जात नाही, असे प्रस्तावनेत ज्येष्ठ कवी डॉ. श्रीधर शनवारे म्हणतात. दुसरीकडे ती बहिणाबाई चौधरींच्या गोत्रातील कविता आहे, हे नमूद करायला डॉ. शनवारे विसरत नाहीत. परंपरागत कवितेशी सुरंगळीकरांचे नाते नाही, तर लोकजीवनातील अनुभवांशी ते आहे, पण त्या लोकजीवनातील दाहकता, लोकसाहित्य, कृषीसंस्कृती यांच्याशी सुरंगळीकरांचे हे नाते शंकास्पद आहे, हेच त्यांच्या कवितेतून दिसून येते.
बहिणाबाईंच्या कवितेतील आर्तता, वेदनांचा हंबर, कल्पकता, प्रतिभा, सहज-सुलभ जीवनाचे तत्त्वज्ञान, आत्मसंवादितता, अनुभवाची प्रखरता हे जीवनभान अन् वाङ्मयीन मूल्येही स्वाती सुरंगळीकर त्यांच्या कवितेत दिसतच नाही. आजची कविता अनाकलनीय, क्लिष्ट व दुर्मुखलेल्या कवींची कविता आहे, अशा काळात इतकी हलकी फुलकी संवादी कविता केवळ प्रांजळपणाने लिहिली जात असेल तर डॉ. शनवारेंचे विधान पडताळून पाहण्यासारखे आहे.
‘या सुखांनो’ (पृ.४-५) मध्ये सुखांची सवय नसल्याचे कवयित्री कबूल करते. सुरंगळीकर यांच्या कवितेत जागोजागी उगाचच तीन टिंबे व अवतरण चिन्हांचा वापर झाला आहे. मुलांची परदेशवारी, वृद्धांचे भारतीय संस्कारशील मन, मैत्रीभाव ही जाणीव व्यक्त होताना कथनात्मक युक्तिवाद आला आहे. ‘खजिना’ भाषा, कॉफीहाऊस, आस, ओळखपत्र, दिलखुलास, निरागस या कविता वाचनीय आहेत. ‘उघडं वाट्टे’ हे ग्रामजीवन अभिव्यक्त करणारी कविता वेगळी चव देणारी आहे. ‘पसंती’ ही कविता बोलगाणी या पातळीवर उतरली आहे. अतिशय साध्या, क्षुल्लक विषयावर अनेक कविता आहेत. योगासन, आनंदित जगण्याची कला, आध्यात्मिक जाणीव, गप्पागोष्टी व सभोवतालच्या सांस्कृतिक जीवमानातील अनुभव, दंतकथांच्या आधारांवरही काही कविता आधारलेल्या आहेत.
८० पृष्ठांचा ‘सुखपारा’ हा काव्यसंग्रह विजय प्रकाशनाने प्रकाशित केला असून १०० रुपये किमतीला तो वाचकांच्या स्वाधीन होणार आहे. वयाच्या एकसष्ठीमध्ये ६१ कवितांचा ‘सुखपारा’ हा कवितासंग्रह काढून ‘षष्ठय़ब्दीपूर्ती सोहळा’ कवयित्रीने साजरा केला आहे. सहज साध्या, सोप्या गेयकविता ओठावर गुणगुणाव्या तशा भावनिक, हळव्या वाचकांनी वाचावी, अशी ही कविता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा