सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाळवा, शिराळा तालुक्यात पावसाने
गेल्या पंधरा दिवसांपासून कृष्णा व वारणेच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. कोयना, चांदोली, धोम, कण्हेर, धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठची शेती जलमय झाली. ऊस, हळद, भुईमूग, केळी, भात ही नगदी पिके दहा दिवसांहून अधिक काळ पाण्याखाली राहिल्याने कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीकाठच्या मळी भागात असणाऱ्या पिकांच्या सुरळीत गाळमाती गेल्याने या पिकांचा भरवसा उरला नाही. शिराळा तालुक्यात तर पावसाने ९० टक्के हजेरी लावून वार्षकि सरासरी गाठली. या पाठोपाठ वाळवा तालुक्यातही पावसाने चांगलाच हात दिला आहे. नदीकाठच्या लोकांना महापुराची धास्ती होती. मात्र पावसानेच थोडीशी उसंत घेतल्याने सध्या तरी हा धोका टळला आहे.
या उलट परिस्थिती खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यांची झाली आहे. जिल्ह्यात पश्चिम भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना या भागात मात्र केवळ पावसाळी वातावरण आणि कधी आली तरी एखादी सर अशीच अवस्था आहे. आजच्या घडीलाही आटपाडीला पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. तालुक्याच्या पूर्वेला असणाऱ्या दिघंची, झरे परिसरात यापेक्षा भीषण परिस्थिती आहे. तालुक्यातील ६० पकी २२ गावे आणि ३५७ वाडीवस्तीवर राहणाऱ्या सुमारे ९८ हजार लोकांना टँकरच्या पाण्याशिवाय पर्यायच उपलब्ध नाही. अशीच परिस्थिती जत तालुक्याच्या पूर्व भागातील आहे. जत तालुक्यात दररोज ८३ टँकरद्वारे १ लाख २६ हजार लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. म्हैसाळ कालव्याच्या पाण्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात पिण्याच्या पाण्याची अवस्था सुसह्य झाली असली, तरी शेतीची अवस्था आटपाडीपेक्षा वेगळी नाही.
जिल्ह्यातील ७८ पकी ३४ तलाव आजच्या घडीलाही कोरडे पडले आहेत. २२ तलावांमध्ये पाणी पातळी मृतसंचयाहून कमी आहे. जत, आटपाडी, तासगाव, मिरज आणि खानापूर-विटा तालुक्यातील बहुतांशी तलाव कोरडे आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडून काही तलाव भरून घेतले असले, तरी यामुळे शेतीची अवस्था मात्र सुधारलेली नाही.
जिल्ह्यात ६३५.३ मि.मी. पावसाची नोंद शिराळा तालुक्यात झाली असून ही जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची हजेरी आहे. मात्र पलूस, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यात पावसाने अद्याप ५० टक्क्यांपर्यंतही हजेरी लावलेली नाही. कवठेमहांकाळ येथे १६२, आटपाडी येथे १८६ मि.मी. पावसाची नोंद झाली असली, तरी ओढय़ा-नाल्यांना अद्याप पाणी आलेले नाही. त्यामुळे विहिरींनी तर तळच गाठलेला आहे.
माळरानावर चारा दिसत असला, तरी जनावरांना अद्याप पुरेसा उपलब्ध नसताना आटपाडी तालुक्यात मात्र चारा छावण्या बंद करण्याचा सपाटा प्रशासनाने लावला आहे. गेल्या चार दिवसांत या तालुक्यातील हिवतड, जांभुळणी, विभुतवाडी, घाणंद, झरे, गोमेवाडी, आंबेवाडी, काळेवाडी, लेंगरेवाडी, मिटकी, खरसुंडी, कानकात्रेवाडी, िपपरी खुर्द व बुद्रुक, मानेवाडी, औटे वाडी, घरनिकी, वाक्षेवाडी आदी ठिकाणच्या चारा छावण्या बंद केल्या आहेत. यामुळे येथील जनावरे चारा-पाण्याविना शेतकऱ्यांच्या दावणीला गेली आहेत.
दुष्काळी पट्टय़ात पश्चिमेकडून येणाऱ्या पावसाचे प्रमाण दरवर्षी कमीच असते. मात्र मान्सूनपूर्व पाऊस आणि परतीचा मान्सून याच भरवशाच्या पावसावर माणगंगा आणि अग्रणीच्या खोऱ्यात शेती व्यवसाय केला जातो. गेल्या तीन वर्षांपासून याच पावसाने दगा दिल्यामुळे शेती तर उद्ध्वस्त होत आहे. पण त्याचबरोबर माणसंही उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.
पावसासाठी देवांना साकडे
दिघंची येथे दुष्काळाने पिचलेल्या लोकांनी पाण्यासाठी देवालाच साकडे घातले आहे. दोन दिवसांपूर्वी या गावातील ग्रामदैवत असणाऱ्या शंभू महादेवाला जलाभिषेक केला. मंदिराचा गाभारा पाण्याने भरून पावसासाठी साकडे घातले. यज्ञयाग, पूजाअर्चा करण्यासाठी गावचे सरपंच पांडुरंग िशदे, उपसरपंच हणमंतराव देशमुख, आटपाडी पंचायत समितीच्या माजी सभापती जयमाला देशमुख आदींसह अख्खा गाव महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी लोटला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा