कलेतील मूल्य, अभिजातता, सौंदर्य, विचारांची देवाण-घेवाण आणि संक्रमण या साऱ्यांचा विचार करत दरवर्षी साकार होणारा सिंधू नृत्यकला महोत्सव यंदा १२ ते १४  एप्रिलदरम्यान मुंबईत माटुंग्यातील रवींद्र नाटय़ मंदिरात आयोजित केला जात आहे. अभिजात नृत्यशैली भरतनाटय़म् कलेतील विविध आयाम घेऊन साकार होणाऱ्या या महोत्सवाचे प्रसिद्ध नृत्य कलाकार वैभव आरेकर दरवर्षी आयोजन करतात.
वनस्पतींना जसा त्यांच्या ठराविक काळात ‘मोहोर’ येतो, तसाच कलाकारांच्या हयातीतदेखील वयाच्या विशिष्ट टप्प्यात कलेचा हा मोहोर बहरतो. भरतनाटय़म्मधील या बहरालाच, योग्य व्यासपीठ देण्याच्या हेतूने सिंधू नृत्यकला महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. चेन्नई येथील प्रसिद्ध नर्तक गुरू सी. व्ही. चंद्रशेखर, मुंबईतील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना उमा डोग्रा, भरतनाटय़म् शैलीतील प्रसिद्ध नृत्यांगना प्रियदर्शनी गोविंद हे यंदाचे निमंत्रित कलाकार आहेत.
स्वत: उत्तम कथ्थक नृत्यांगना, संशोधिका, संरचनाकार असणाऱ्या संजुक्ता वाघ आणि त्यांचा नृत्यसंच या महोत्सवात काही कलाकृती सादर करणार आहेत. सांख्यनिर्मित आणि वैभव आरेकर दिग्दर्शित ‘नरसिंह, अस्तित्व, विरहिणी’ ही सांघिक कलाकृती, ओडिसी नृत्यगुरू केलुचरण मोहपात्रा यांचे चिरंजीव रतिकांत मोहपात्रा यांच्या सृजन संस्थेचे नृत्य सादरीकरण हे यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने नुकताच पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आरेकर यांच्या गुरू कनक रेळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी आरेकर त्यांच्या काही रचना सादर करणार आहेत. एकल-सांघिक नृत्याविष्कार, परंपरा आणि नावीन्याचा शोध, विविध वयोमानातील कलाकारांचा सहभाग हे या सिंधू नृत्यकला महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे.  या महोत्सवाचे आयोजन एक शास्त्रीय नर्तक, दिग्दर्शकच करत आहे. जेव्हा अशी व्यक्तीच एखाद्या महोत्सवाच्या मागे उभी राहते, त्या वेळी तिथे केवळ उत्सव न राहता सोहळय़ाला एक वैचारिक बैठक मिळते. ज्यातून नृत्यशैली सादरीकरणाचे भान जपले जाते. नवनव्या कलाकारांना उमेद मिळते. आंतरिक लय सापडते. नृत्याच्या वैचारिक-तात्त्वीक प्रक्रियेचा प्रवास सुरू होतो. नृत्यकलेच्या या विश्वातच सिंधू नृत्यकला महोत्सव दरवर्षी भर घालत आहे. नृत्याचा ध्यास, वेड घेतलेल्या कलाकारांचा हा महोत्सव येत्या १२ एप्रिलपासून माटुंग्यातील रवींद्र नाटय़ मंदिरात भरत आहे. या कला महोत्सवाचे एक पुष्प २० एप्रिल रोजी पुण्यातील बालशिक्षण सभागृहात होत आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा