‘बीडची सिंधुताई’ व ‘गरजूंची माय’ म्हणून अध्र्या शतकापूर्वीपासून बीडमधील सगळे त्यांना ओळखत होते. कोणत्याही अपेक्षेशिवाय केलेल्या कामाचे मोल कधी कमी होऊ शकत नाही. प्रसिद्धीच्या पडद्याआड राहून अनेक उपेक्षितांच्या जीवनाची वाट उजळण्याचे सत्कार्य फार थोडय़ांना करता येते. ‘बीडच्या सिंधुताई’ त्यापकीच अग्रगण्य!
शहरातील सिंधुताई दत्तात्रय कोल्हे (वय ८०) यांचे अलीकडेच निधन झाले. कर्मयोगी अॅड. दत्तात्रय कोल्हे यांच्या त्या पत्नी. पन्नास वर्षांपूर्वी संधी असतानाही वकिली पेशा न पत्करता गोरगरिबांना मदत करण्याचा निर्णय कोल्हे यांनी घेतला. संपत्ती जमा करण्यापेक्षा आपल्या मुलांबरोबर ग्रामीण भागातील अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी घरातच आश्रय दिला, प्रोत्साहित केले. पतीच्या सामाजिक कार्याला समर्थपणे साथ देऊन काटकसरीने संसार व मुलांवर संस्कार करण्याचे काम सिंधुताईंनी केले.
अॅड. दत्तात्रय कोल्हे यांचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले. पन्नास वर्षांपूर्वी शिक्षण घेऊन वकील झालेल्या कोल्हे यांचा श्रीरामपूरच्या नवले कुटुंबातील सिंधू यांच्याशी विवाह झाला. माहेरी शैक्षणिक वातावरण असल्याने सिंधुताई ब्रिटिश काळातील दहावी उत्तीर्ण. त्यांचे बंधू भागवतराव नवले अभियंता. पुढे ते पाटबंधारे विभागातून मुख्य अभियंतापदावरून निवृत्त झाले. त्या काळात बहुजन समाजात शिक्षणाचे प्रमाण नगण्यच होते. अशा वेळी बीड येथे उत्तमप्रकारे वकिली करीत असलेल्या अॅड. कोल्हे यांनी संधी असतानाही पेशाचा व्यवसाय न करता सामान्य माणसाला मदत करण्याची भूमिका घेतली. डाव्या विचारांचा प्रभाव असल्याने मुलाबाळांसाठी संपत्ती जमविण्यापेक्षा आपल्या मुलांबरोबर समाजातील, नात्यातील जवळच्या गरीब मुलांना शिक्षण देण्यास प्रयत्न केला. अनेक मुलांना घरीच आश्रय दिला. यातील अनेक जण आज मोठय़ा पदावर कार्यरत आहेत. या काळात पतीच्या कामाला मनापासून साथ देत काटकसरीने संसार करून सिंधुताईंनी मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना उच्चशिक्षित केले. प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. बाळासाहेब, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक, अॅड. मुकुंद व प्रताप ही त्यांची मुले. धार्मिक वृत्तीच्या सिंधुताई यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक जण मायेने त्यांच्याशी जोडला गेला.

Story img Loader