दहा पदरी रुंद करण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग १ जुलैपासून वाहतुकीस पूर्णपणे खुला होत असून शीव-पनवेल महामार्गावर यापूर्वी लागणारा एक ते दीड तासांचा प्रवास आता या रस्त्याच्या रुंदीकरण आणि सिमेंट क्राँक्रीटीकरणामुळे अध्र्या तासात पूर्ण होणार आहे. पुणे, पनवेल, गोवा आणि कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांना हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. मात्र त्यासाठी त्यांच्या खिशाला चाट पडणार आहे.
पुणे-गोव्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि शहरातील रस्त्यांमुळे एक ते दीड तास लागत होता. या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रुंदीकरण आणि सिमेंट क्राँक्रीटीकरणाचे काम बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा या तत्त्वावर अडीच वर्षांपूर्वी दिले. एक हजार २३० कोटी रुपयांचे हे काम सायन-पनवेल टोल प्रा. लि. या कंपनीने पूर्ण केले असून या मार्गावर मानखुर्द, सानपाडा, शिरवणे, नेरूळ , सीबीडी, कळंबोली येथे उड्डाणपूल बांधले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विनाव्यत्यय सुरू राहणार आहे. यासाठी बेलापूर येथील सीबीडी खिंडीचे ११ मीटर रुंदीकरण आणि उंची कमी करण्यात आली आहे. ही खिंड या वाहतुकीस मोठा अडथळा ठरणारी होती. याच खिंडीला जोडणाऱ्या उरण नाक्यावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे जेनएनपीटीकडे जाणाऱ्या जड वाहतुकीला अडचण भासणार नाही. या मार्गावर सुरू असणारे पावसाळी नाले उभारणीचे काम काही ठिकाणी बाकी असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले आहे. मात्र या रस्त्यामुळे नवी मुंबईवर पडणारा वाहतुकीचा बराचसा ताण कमी होणार आहे. सानपाडा येथील उड्डाणपुलामुळे एपीएमसीमध्ये ये-जा करणाऱ्या ट्रकसाठी फार मोठा दिलासा मिळणार आहे. मंगळवारपासून हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीस खुला होत असल्याने रस्ता बांधणाऱ्या कंपनीने खारघर स्पॅगेटी येथे खासगी बंदोबस्तात टोलनाका उभारला आहे. या मार्गासाठी कमीत कमी तीस आणि जास्तीत जास्त पावणेदोनशे टोल बसण्याची शक्यता आहे. हा दर मुंबईत प्रवेश करताना द्याव्या लागणाऱ्या टोलनाक्यावरील दराइतकाच आहे.
सायन-पनवेल द्रुतगती महामार्ग सुसाट
दहा पदरी रुंद करण्यात आलेला सायन-पनवेल महामार्ग १ जुलैपासून वाहतुकीस पूर्णपणे खुला होत असून शीव-पनवेल महामार्गावर यापूर्वी लागणारा एक ते दीड तासांचा प्रवास आता या रस्त्याच्या रुंदीकरण आणि सिमेंट क्राँक्रीटीकरणामुळे अध्र्या तासात पूर्ण होणार आहे.
आणखी वाचा
First published on: 01-07-2014 at 07:27 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sion panvel highway