सायन-पनवेल महामार्गावरील स्पॅगेटी थांबा खारघरवासीयांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. गेल्या पाच वर्षांत खारघरच्या स्पॅगेटी थांब्यावरून रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात ३४ जणांना प्राण गमावावे लागले आहेत. तसेच ३३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक माहिती खारघर नागरिक समितीने माहितीच्या अधिकारात उजेडात आणली आहे. विशेष म्हणजे ३४ बळी गेल्यावरही सरकारी यंत्रणांना कोणतीही ठोस उपाययोजना करू शकलेली नाही. आणखी किती बळी गेल्यावर ही यंत्रणा जागी होणार आहे, असा सवाल खारघरवासीय उपस्थित करत आहे. खारघर शहराचे नाव मोठे आणि लक्षण खोटे असे बोलण्याची वेळ आली आहे. महामार्गाची सुरक्षा वाऱ्यावर सोडून येथे रस्त्यांची काँक्रीटीकरण आणि रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र हा डोलारा पिटताना रस्ता ओलांडणाऱ्या प्रवाशांच्या प्राणांचा विचार करताना सरकारी यंत्रणा दिसत नाही. एखाद्या कारखान्यात मजूर काम करताना अपघात घडला तरी सुरक्षेचे नियम पडताळले जातात. मात्र येथे सरकारचे कोणताही विभाग या ३४ अपघातांसाठी जबाबदार धरला जात नसल्याने चित्र आहे. उपायोजनेचा अभाव आणि सरकारी यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे खारघर स्पॅगेटी आणि घरकुल येथील रहिवाशांना रोज जीव मुठीत घेऊन हा मार्ग ओलांडावा लागत आहे. खारघर नागरिक समितीचे अध्यक्ष एस. बी. सिंग आणि खजिनदार पंकज जाधव यांनी याबाबत गेल्या महिन्याभरापासून या माहितीचा आधार घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते परिवहन विभाग आणि वाहतूक यंत्रणेकडे सुरक्षतेच्या दृष्टीने उपायोजना करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र ३४ जणांचे बळी गेल्यानंतरही प्रशासन ढिम्म असल्याची खंत जाधव यांनी व्यक्त केली. या मार्गावरून वाहने दामटवणाऱ्या वाहनचालकांमध्ये स्पर्धेची मुजोरी अनेकांसाठी जीवघेणी ठरत आहे. महामार्गावर पोलीस उपायुक्त विजय पाटील यांच्या पुढाकाराने सिग्नल यंत्रणा उभारली होती. मात्र सिग्नल एकीकडे, पोलीस दुसरीकडे आणि रस्ता ओलांडणारे तिसरीकडे अशी येथील अवस्था सर्वानी अनुभवली आहे. खारघरचा स्पॅगेटी थांबा हा प्रवाशांसाठी जीवघेणा होत असताना समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला पादचारी पुलाचे काम कुठपर्यंत आल्याची माहिती विचारली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे आलेले उत्तर धक्कादायक आहे. या विभागाने याबाबतच्या आराखडा आलेखाबद्दल सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविल्याचे या लेखी उत्तरात म्हटले आहे. ३४ जणांचे बळी गेल्यानंतरही सरकारचे प्रस्ताव तंत्र कधी संपले, असा प्रश्न खारघर स्पॅगेटीच्या नागरिकांना पडला आहे. लालफितीच्या या कारभाराबद्दल समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यानंतर संबंधित सक्षम अधिकाऱ्यांचे नाव आणि या प्रस्तावाला सरकारी किती कालावधी लागेल, याची माहिती विचारली. मात्र याचे उत्तर अजूनही समितीला कळाले नाही.

महामार्ग ओलांडण्यासाठी या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याची मागणी सातत्याने होत आहे. यासाठी नागरिकांकडून आंदोलने करण्यात आली. नागरिकांच्या आक्रोशानंतर पूल उभारणीसाठी बांधकाम विभागाकडून काहीशी हालचाल करण्यात आल्याचे चित्र होते. मात्र समितीच्या वतीने माहितीच्या अधिकारात सार्वजनिक बांधकाम विभागाला पादचारी पुलाचे काम कुठपर्यंत आल्याची माहिती विचारली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे आलेले उत्तर धक्कादायक होते. या विभागाने याबाबतच्या आराखडा आलेखाबद्दल सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविल्याचे यात म्हटले आहे.

Story img Loader