शिवसेना कार्याध्यक्ष जाणून घेणार सुनील बागूल यांची भावना
शिवसेनेतील यादवीत हकालपट्टी करण्यात आलेले माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांच्याविषयी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी १५ जानेवारी रोजी बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिल्यामुळे पक्षातील जुन्या गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या बैठकीस बागूल हेही उपस्थित राहणार आहेत. बागूल यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त बुधवारी येथे येऊन धडकल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केल्याने कार्याध्यक्षांनी बागूल यांचीही बाजू ऐकून घेण्याचे मान्य केले आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या बैठकीनंतर ‘तिळगुळ’ वाटप होण्याची आशा बागूल समर्थकांना आहे.
नव्या व जुन्या पदाधिकाऱ्यांमधील वादाची परिणती माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांच्या हकालपट्टीत झाल्यानंतर
दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, नगरसेवक अ‍ॅड. शिवाजी सहाणे आणि डी. जी. सूर्यवंशी यांनी मुंबईत ‘मातोश्री’वर जाऊन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमागे कोणत्या गटाविषयी तक्रार वा कोणाची बाजू मांडण्याचा उद्देश नव्हता तर संघटनेच्या दृष्टीकोनातून बाजू मांडण्याचा प्रयत्न असल्याचे अ‍ॅड. सहाणे यांनी नमूद केले. विद्यमान जिल्हाप्रमुख व नव्या पदाधिकाऱ्यांविरोधात टीकास्त्र सोडून पक्ष कार्यालयाचा ताबा घेऊन समांतर काम करण्याच्या इशाऱ्यामुळे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे देखील संतप्त झाल्याचे सांगितले जाते. पक्षांतर्गत वाद पक्षात मिटविता येऊ शकतात. काही तक्रारी असल्यास वरिष्ठांकडे दाद मागता येईल. असे पर्याय असताना जाहीरपणे आरोप-प्रत्यारोप करून पक्षविरोधी काम केल्यावरून बागूल यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला. परंतु, हा निर्णय एकतर्फी झाल्याची भावना व्यक्त करत जुन्या पदाधिकाऱ्यांच्या गटाने त्याचे संघटनेवर होणारे विपरित परिणाम कार्याध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. या विषयावर कार्याध्यक्षांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. बागूल हे तीन दशकांपासून शिवसैनिक म्हणून काम करत आहेत. त्यांना कधी पक्ष सोडून जायचे नाही. हकालपट्टीनंतरही त्यांची सेनेत राहण्याची इच्छा आहे. त्यांच्याविषयी जे चित्र वरिष्ठांसमोर निर्माण करण्यात आले, ते योग्य नाही. यामुळे त्यांची बाजू जाणून घ्यावी, अशी विनंती गायकवाड व अ‍ॅड. सहाणे यांनी केली. वास्तविक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मागील महिन्यात नाशिकमध्ये आयोजित मेळाव्यात नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शिवसैनिक एकत्र आले होते. यावेळी आपआपसातील मतभेद बाजूला ठेऊन पक्षाचे काम करण्याची ग्वाही सर्व नेत्यांनी एकदिलाने दिली होती. तथापि, या भावनिक भेटीनंतर अवघ्या महिनाभरात स्थानिक नेत्यांमधील असंतोष उफाळून आला. पालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, गटनेते अजय बोरस्ते यांच्यावर थेट सेना स्टाईलने शाब्दिक हल्ले चढवत बागूल यांनी सर्वाचा रोष पत्करून घेतला. जुन्या गटातील पदाधिकाऱ्यांची भावना लक्षात घेऊन या प्रश्नावर लवकरच स्थानिक पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलविण्याचे आश्वासन देण्यात आले. १४ तारखेपर्यंत कार्याध्यक्ष वेगवेगळ्या कामात व्यस्त असून त्यानंतर बागूल समर्थकांना बोलविले जाणार आहे. त्यावेळी बागूल यांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे.
या आश्वासनामुळे चार ते पाच दिवसांपासून चिघळलेला सेनेतील वाद काही अंशी का होईना शमण्याची चिन्हे आहेत. आदल्या दिवशी जुन्या गटाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी फुललेले शहरातील सेना कार्यालय गुरूवारी सुनेसुने होते. बंदोबस्तावरील पोलीस वगळता कोणी फारसे तिकडे फिरकले नाही. या संदर्भात विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासह नव्या गटातील नेत्यांनी मौन बाळगणेच पसंत केले. सेनेतील अंतर्गत वादाचा निकाल आता संक्रांतीनंतर लागू शकेल, असे एकंदर चित्र आहे.