सर्वसाधारणपणे एका दिग्दर्शकाचे एक किंवा दोनच चित्रपट वषर्भरात प्रदर्शित होतात. परंतु, दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे एकदम सहा चित्रपट २०१३ वर्षअखेपर्यंत प्रदर्शित होणार आहेत.
भारतीय चित्रपटांचे शतसांवत्सरिक वर्ष लक्षात घेऊन चित्रपटसृष्टीतील वेगवेगळ्या गोष्टींचा जनमानसावर झालेला परिणाम चार लघुपट एकत्रित करून एका चित्रपटाच्या माध्यमातून घेण्यात आलेला ‘बॉम्बे टॉकीज’ अनुराग कश्यप, करण जोहर, झोया अख्तर, दीबाकर बॅनर्जी यांचा आहे. हा चित्रपट तर लवकरच प्रदर्शित होत असून त्याचा विशेष खेळ १५ मेपासून सुरू होत असलेल्या प्रतिष्ठेच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही होत आहे. त्याचबरोबर अनुराग कश्यप सहनिर्माता असलेला ‘मान्सून शूटआऊट’ हा आणखी एक चित्रपट कान्समध्ये दाखविला जाणार आहे. त्यामुळे कान्स महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट प्रदर्शित होत असल्याबद्दल अनुराग कश्यप चांगलेच चर्चेत आले आहेत.
‘बॉम्बे वेलवेट’ या चित्रपटाचे चित्रीकरण २२ जूनपासून सुरू असून त्यात रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे. तर ‘अग्ली’ हा शीर्षकामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती कश्यप यांनी दिली. कान्समध्ये दाखविण्यात येणाऱ्या ‘मान्सून शूटआऊट’चे दिग्दर्शन अमित कुमार असून हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर आधी आणि भारतामध्ये नंतर प्रदर्शित केला जाणार असल्याचे ते म्हणाले. आपला आणखी एक चित्रपट ‘हंसी तो फंसी’ हादेखील याच वर्षी प्रदर्शित होत असून त्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा व परिणीती चोप्रा हे कलावंत आहेत. तर ‘शहीद’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. शहीद या चित्रपटाची निर्मिती आपण केली असून दिग्दर्शन हन्सल मेहता यांचे आहे. वास्तवातील घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित ‘लूटेरा’ हा रणवीर सिंग, सोनाक्षी सिन्हा यांचा चित्रपट जुलैमध्ये तर ‘क्वीन’ हा फॅण्टम प्रॉडक्शनचा आणखी एक चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित करण्याचा मानस कश्यप यांनी व्यक्त केला. ‘पेडलर्स’ हा वसंत बाला दिग्दर्शित चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले.