*    ‘जलाराम स्वीट्स’ विरोधात फौजदारीचे स्थायी समिती  सभापतींचे निर्देश
*    अवैधरित्या भट्टी चालविणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा
शहरातील कॉलेजरोडवरील जलाराम स्वीट्स या दुकानाला लागलेली आग विझविताना अचानक आगीचे लोळ अंगावर आल्याने अग्निशमन दलाचे सहा जवान जखमी झाले. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलास तीन तास शर्थीने झुंज द्यावी लागली. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित व्यावसायिकाविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह शहरात या पद्धतीने विनापरवाना भट्टी चालविणाऱ्या हॉटेल व मिठाई व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांनी दिले आहेत.
‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कॉलेजरोडवरील नेमीनगर या इमारतीत ही घटना घडली. इमारतीत जलाराम फरसाण व स्वीटमार्ट हे दुकान आहे. सकाळी सातच्या सुमारास दुकानातील पोटमाळ्यातून धूर येत असल्याचे काही जणांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. मालक जयेश ठक्कर यांनीही घटनास्थळी धाव घेतली. इमारतीत वरील मजल्यांवर फ्लॅट असून तेथील नागरीकांना धोका पोहोचू नये म्हणून अग्निशमन दलाने प्रथम संपूर्ण इमारत रिकामी केली. त्यानंतर दुकानाचे शटर उघडण्यात आले. दुकानाच्या पोटमाळ्यावर प्रचंड धूर पसरलेला होता. वर जाण्यासाठी छोटासा जिना आहे. त्यावरून अग्निशमन दलाचे कर्मचारी एका पाठोपाठ एक पुढे सरकत असताना स्फोटासारखा आवाज झाला आणि आगीचे लोळ त्यांच्या अंगावर आले. अचानक घडलेल्या या प्रकाराने दोन कर्मचारी जिन्यावरून खाली कोसळले तर तीन जण जखमी झाले. सलग दोनवेळा असे प्रकार घडल्याची माहिती दलाचे प्रभारी अधिकारी व्ही. के. गवळी यांनी दिली.
या दुर्घटनेत आर. एस. नाकील, ए. एस. सरोदे, पी. पी. बोरसे, व्ही. जी. नागपुरे, बी. एन. खोडे आणि हेमंत बेळगावकर हे कर्मचारी जखमी झाले. काहींचे चेहरे तर काहींचे हात भाजले गेले. जिन्यावरून पडल्याने नाकील यांच्या खांद्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. आग विझविण्यासाठी पुढे सरसावलेल्या कर्मचाऱ्यांनी अग्नि प्रतिबंधक पोषाख परिधान केलेला असल्यामुळे जिवितहानी टळल्याची बाब दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केली.
जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटमाळ्यावरील एकूणच स्थिती लक्षात घेऊन दलाने अधिक सावधगिरी बाळगत आग विझविण्याचे काम पुन्हा हाती घेतले. ही जागा अतिशय अरूंद असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत होत्या. उपरोक्त भागात हवा बाहेर येण्यास जागाच नसल्याने सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते. यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना श्वास घेणेही अवघड झाले होते. या परिस्थितीत सलग तीन तास प्रयत्न केल्यावर आग विझविण्यात आली. दुकानातील पोटमाळ्याचा गोदाम म्हणून वापर केला जात होता. या ठिकाणी मिठाई व तत्सम खाद्यपदार्थाची साठवणूक करण्यात आली होती. तसेच इन्व्हर्टर व बॅटरी एका बाजूला ठेवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग लागली असल्याचा अंदाज गवळी यांनी व्यक्त केला. दुकानातील बहुतेक माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
या घटनेची माहिती समजल्यानंतर महापौर अ‍ॅड. यतिन वाघ व आयुक्त संजय खंदारे यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेऊन जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जलाराम फरसाण व स्वीट्सच्या मालकाविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश अग्निशमन विभागास दिले. दुकानात आग लागल्यानंतर मालकाने उपरोक्त ठिकाणी काय साधनसामग्री आहे, गॅस सिलिंडर व भट्टय़ांची योग्य माहिती अग्निशमन दलास दिली नाही. यामुळे दलाचे कर्मचारी जखमी झाले.
या दुर्घटनेस संबंधित मालक जबाबदार असल्याचा ठपका धोंगडे यांनी ठेवला. शहरातील अनेक निवासी इमारतींमध्ये मिठाई व हॉटेल व्यावसायिक कार्यरत आहेत. त्यांच्याकडून भट्टी चालविण्याची परवानगी घेतली गेलेली नाही. यामुळे भविष्यात काही दुर्घटना घडल्यास रहिवाशांच्या जिवावरही बेतू शकते. यामुळे अग्निशमन दलाने अशा सर्व व्यावसायिकांची छाननी करण्याची सूचनाही धोंगडे यांनी केली.