दुष्काळ आणि प्रखर उन्हाळ्याची धग सहन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात पाणीपुरवठा करण्यासाठी वापर केल्या जाणाऱ्या टँकरची संख्या सहाशेच्या दिशेने वाटचाल करीत आहे, तर मुक्या जनावरांसाठी चारा छावण्यांची संख्याही २७३ वर पोहोचली आहे. टँकर व चारा छावण्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सर्वाधिक ८८ टँकर सांगोला तालुक्यात असून त्याठिकाणी बाधित एक लाख ३४ हजार ६३१ लोकसंख्येची ७४ गावे व ६१८ वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या खेपा २०५ पर्यंत वाढल्या आहेत. त्याखालोखाल उसाचे क्षेत्र असूनदेखील तहानलेल्या माढा तालुक्यात ८४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या तालुक्यात ७८ गावे व ३५९ वाडय़ांमधील एक लाख ७९ हजार लोकसंख्या बाधित आहे. त्यासाठी दररोज १८५ टँकरच्या खेपा चालत आहेत. पंढरपूर तालुक्यात ७५ टँकरचा वापर करून ५१ गावे व ३४५ वाडय़ांना पाणीपुरवठा होत आहे, तर करमाळा तालुक्यात ७१ गावे व ४६० वाडय़ांना पाणी देण्यासाठी ७४ टँकरचा वापर केला जात आहे.
दुष्काळाचे शाप कायम असलेल्या मंगळवेढा तालुक्यात ६७ टँकरचा वापर करून ५४ गावे व ३८१ वाडय़ांना म्हणजे बाधित एक लाख १६६१ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी दररोज करायला लागणाऱ्या टँकरच्या खेपा शंभपर्यंत वाढल्या आहेत. मोहोळ तालुक्यात ४९ गावे व २६१ वाडय़ांना पाणीपुरवठा करण्यासाठी ६४ टँकर उपलब्ध असून त्यांच्या दररोजच्या खेपा १३० पर्यंत आहेत. याशिवाय माळशिरस (२७), अक्कलकोट (२८), बार्शी (२८), दक्षिण सोलापूर (२०), उत्तर सोलापूर (२१) याप्रमाणे टँकर लागत आहेत. जिल्ह्य़ात पाण्याअभावी तहानलेली ४५५ गावे व २५१० वाडय़ांची संख्या असून बाधित लोकसंख्या ११ लाख ५७ हजार ६५९ एवढी आहे. दररोज पाणीपुरवठा करताना ५७१ टँकरच्या १२२५ खेपा होत आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने २६८ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
जिल्ह्य़ात टँकरची संख्या वाढत असताना दुसरीकडे जनावरांच्या चारा छावण्यांची संख्याही वाढत आहे. सध्या चारा छावण्यांची संख्या २७३ पर्यंत पोहोचली असून यात एक लाख ८२ हजार ९०३ मोठी व २७ हजार ३१७ लहान अशी एकूण दोन लाख १० हजार ४० जनावरे दाखल आहेत. अर्थात सर्वाधिक ९८ चारा छावण्या सांगोला तालुक्यात आहेत. त्यावर दररोजचा खर्च ५९ लाख ८४ हजार एवढा होत आहे. संपूर्ण चारा छावण्यांसाठी आतापर्यंत १७८ कोटी ३६ लाख ७१ हजारांचा खर्च झाला आहे. याशिवाय गेल्या वर्षी १५ ऑगस्टपूर्वी चारा डेपोंसाठी झालेला खर्च शंभर कोटींचा आहे. सध्या चारा छावण्यांसाठी शासन दररोज एक कोटी ७७ लाख ८५ हजार इतकी रक्कम मोजत आहे.
सोलापुरात टँकरची संख्या सहाशेच्या घरात
दुष्काळ आणि प्रखर उन्हाळ्याची धग सहन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात पाणीपुरवठा करण्यासाठी वापर केल्या जाणाऱ्या टँकरची संख्या सहाशेच्या दिशेने वाटचाल करीत आहे,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-05-2013 at 12:30 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six hundred water tankers in solapur