शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाल्याची घटना चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथे घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून ३३ जणांविरुध्द वडनेरभैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भोयेगाव येथे बाबूराव गलांडे शेतात काम करत असताना संशयित जगन बोरसे, गंगाधर बोरसे व त्यांच्या दहा ते पंधरा साथीदारांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचे पर्यावरण हाणामारीत झाले. यावेळी गलांडे कुटुंबातील सदस्यांनी शेतात धाव घेतली. संशयितांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, संशयितांनी त्यांना लाठय़ा-काठय़ांच्या सहाय्याने मारहाण केली. त्यात गलांडे कुटुंबातील सहा जण जखमी झाले. त्यांच्यावर वडाळीभोई येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वाची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी धनराज गलांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गंगाधर बोरसे, जगन्नाथ बोरसे यांच्यासह १२ ते १५ जणांविरुध्द वडनेरभैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर भगवान बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीत शेतीच्या वादातून कुरापत काढून मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे. यावरून गलांडे कुटुंबातील सदस्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader