सात स्वस्त धान्य दुकानांची प्रशासनाच्या वतीने तपासणी करण्यात आली असता सहा दुकाने बंद आढळून आल्याने तसेच दुकानदारांना बोलावूनही ते उपस्थित न राहिल्याने या दुकानांना सील ठोकण्यात आले.
जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर, तहसीलदार नितीन पाटील यांच्या पथकाने थाळनेर, भारपुरा व बोराडी या तीन गावांतील दुकानांची तपासणी करण्यात आली. तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून माल मिळत नसल्याच्या व दुकाने नेहमी बंद राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत असल्याने  हे छापे टाकले. जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच तालुका पुरवठा अधिकारी व्ही. पी. दीक्षित यांच्या पथकाने भाटपुरा येथे तपासणी केली. त्यात के. आर. जैन यांचे दुकान बंद आढळले. जैन यांच्याशी संपर्क साधूनही ते उपस्थित न झाल्याने त्यांचे दुकान सील केले. नाशिक येथील आयुक्त कार्यालयातील पुरवठा अधिकारी डी. बी. बारगळ, धुळ्याचे पुरवठा निरीक्षक एन. ई. राजपूत यांनी बोराडी येथील तीन दुकानांची तपासणी केली असता ती बंद होती. त्यात जंगल कामगार संस्था व आदिवासी विकास सोसायटी या सहकारी संस्थांची दुकानेही बंद आढळून आली. थाळनेर येथे तहसीलदारांनी मंगलाबाई दर्डा, हिराबाई ठाकूर व थाळनेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या दुकानांची तपासणी केली असता ते बंद होते. अरुण ठाकरे यांचे दुकान सुरू असल्याचे दिसून आले. तपासणीत त्यांच्याकडे तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे बीपीएलची कोरी कार्ड मिळून आल्याने तहसीलदारांनी ते जप्त केले.

Story img Loader