करीना भरत सोनार ही सहा वर्षे वयाची मुलगी तुर्भे येथील इंदिरानगर येथून ३० एप्रिल रोजी रात्री ९.३० च्या सुमारास बेपत्ता झाली आहे. घराजवळच रात्री खेळत असताना तिला पळवून नेले असल्याचा संशय असून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत सोनार हे दुर्गा फोटो स्टुडिओ, शिवमंदिराच्या शेजारी, इंदिरानगरसमोर, तुर्भे, नवी मुंबई येथे राहतात. ३० एप्रिल रोजी रात्री ते घरी आले आणि करीना दिसली नाही म्हणून त्यांनी आपला दहा वर्षांचा मुलगा सुमन याला करीनाला बोलावून आणायला सांगितले. परंतु, नेहमी खेळण्याच्या ठिकाणी करीना त्याला सापडली नाही. त्यानंतर भरत सोनार यांनी परिसरात तिचा खूप शोध घेतला. अखेरीस तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एस. शिंदे करीत आहेत. तीन फूट उंच असलेली करीना गोऱ्या रंगाची असून तिच्या कपाळावर उजव्या बाजूला जुन्या जखमेचा व्रण आहे. अंगाने सडपातळ आणि नाक बसके असून बेपत्ता झाली तेव्हा करीनाने राखाडी रंगाचा फ्रॉक परिधान केला होता. करीना नेपाळी भाषा बोलते. तिच्या नाकात सोन्याची चमकी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अशी मुलगी कोणाला सापडल्यास त्यांनी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader