टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर या मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम मागील तीन महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या संथगती कामाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जागोजागी रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने सकाळ-संध्याकाळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.
महागणपतीच्या दर्शनासाठी विविध भागांतून हजारो नागरिक दररोज टिटवाळ्यात येतात. त्यामुळे खासगी वाहने, रिक्षा, टांगे, बसगाडय़ा अशा वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते. या मार्गावर एखादे वाहन बंद पडले की रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होते. पर्यायी रस्ते नसल्याने काही तास वाहतूक कोंडीत नागरिकांना अडकून पडावे लागते.
टिटवाळा रेल्वे स्थानक ते टिटवाळा मंदिरापर्यंत तीन महिन्यांपासून सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे काम ठेकेदाराने लवकर पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सिमेंट रस्ते कामाचे जे टप्पे पूर्ण झाले आहेत, तो मार्ग तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. निमकर नाका ते रिजन्सी प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता कामासाठी गेल्या एक महिन्यापासून खोदून ठेवण्यात आला आहे. मुख्य बाजार पेठेकडे हा रस्ता जातो, त्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडी सुरू असते. नागरिकांना या भागात चालणे अवघड होते. रस्त्यावरील सगळी धूळ दुकानात येत असल्याने व्यापारी, रहिवासी हैराण झाले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांचे ठेकेदारावर नियंत्रण नसल्याने ही सगळी परिस्थिती ओढावली असल्याची टीका रहिवासी करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा