आर्णी तालुक्यात अतिवृष्टी व चार वेळा आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. खरीप पिके हातून गेल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शासनाने त्वरित आर्थिक मदतीचा द्यावा व सरसकट २५ हजार रुपये एकर अनुदान देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ख्वाजा बेग यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
या तालुक्यात चार वेळा पुरामुळे पीक हानी झाली तसेच शेकडो कुटुंबांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने झळ सहन करावी लागली. जिल्ह्य़ातील पूरग्रस्तांचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावा, सर्वेक्षणाचे काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार? असाही प्रश्न उपस्थित करून आर्णी तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील तसेच ख्वाजाबेग यांनी या भागाचा दौरा केला व पूरग्रस्तांच्या व्यथा समजावून घेतल्या आहे.
तालुक्यात आतापर्यंत १३५० मि.मी. च्या वर पावसाची नोंद झाली असून सुमारे दोन ते तीन हजार हेक्टर शेती खरडून गेली. २० हजार हेक्टरमधील पीक अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली अहे. आर्णीसह तालुक्यातील बोरगाव (पुंजी), पहूर, कोसदणी या गावांचे पुनर्वसनही त्वरित करण्यात यावे, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली. शासनाचा प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल ७२४७ हेक्टर नुकसानीचा होता. मात्र त्यापेक्षा तिपटीने नुकसान झाले असून सर्वेक्षणही योग्य पद्धतीने व्हावे, अशीही त्यांनी मागणी केली. पिकांचे सर्वेक्षण तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांचे पथक करीत असल्याची माहिती असून अहवाल जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी शुक्रवापर्यंत मागितला आहे.
अतिवृष्टीग्रस्त भागाचे संथ गतीने सर्वेक्षण
आर्णी तालुक्यात अतिवृष्टी व चार वेळा आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. खरीप पिके हातून गेल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
First published on: 08-08-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slow survey of huge rain affected area