जागतिक मंदीचा तडाख्यामुळे नागपूरच्या महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पाची प्रगती ठप्प झाल्याची कारणे आता समोर केली जात असली तरी मुळात मिहानच्या उभारणीचा नेमका उद्देशच अद्याप स्पष्ट झालेला नाही. मिहानच्या मृगजळामागे नुसतीच धावाधाव सुरू आहे. नागपूर देशाच्या मध्यवर्ती स्थानी असल्याने मिहानच्या उभारणीचा फायदा नागपूरसह विदर्भाला मिळणार असल्याची स्वप्ने दाखविण्यात आली होती. पण, मिहान म्हणजे नेमके काय, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मिहानच्या संथ प्रगतीवरून आक्रमक भूमिका घेणारे विदर्भातील उद्योजक मिहानमध्ये गुंतवणूक का करीत नाही, असा सवाल आता डोके वर काढत आहे. मिहानसाठी या भागातील शेतक ऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली. त्यामुळे शेतकरी कुटुंबे विस्थापित झाली असून या भागातील ७० ते ७५ कोटींची वार्षिक उलाढाल असलेला दुधाचा जम बसलेला व्यवसाय मात्र बुडाला आहे.
मिहानबाबत अगदी प्रारंभापासून उद्योजक आणि जनतेमध्ये सतत संभ्रमाचे वातावरण राहिले आहे. मिहानमध्ये आंतरराष्ट्रीय कार्गो हब उभारला जाऊन नागपूर जगाशी जोडले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) राहील, असा निर्णय घेण्यात आला. नंतर गृहबांधणी प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. प्रत्यक्षात मिहानमध्ये गेल्या १८ वर्षांपासून कोणतेही उद्योग सुरू झालेले नाहीत. गृहबांधणी प्रकल्प भकास पडलेले आहेत. राहण्यासाठी कोणीही आलेले नाही. प्रकल्पातील उद्योगांना आगामी पाच वर्षांपर्यंत गती मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याचे चित्रदेखील आता स्पष्ट झाले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जागतिक मंदीचे कारण सांगून मिहानच्या प्रगतीबाबत कानावर हात ठेवल्याची तीव्र प्रतिक्रिया उद्योजकांमध्ये उमटली आहे. मंदीच्या तडाख्यातही जगातील असंख्य उद्योग सुरू आहेत. उद्योगांच्या नफ्यात किंचित घट झाली असू शकते परंतु, उद्योगांची उभारणी थांबलेली नाही, असा एक मतप्रवाह आहे. विदर्भात बाहेरील उद्योजक गुंतवणूक करीत नसल्याची ओरड केली जात असली तरी येथील स्थानिक उद्योजकांनीही मिहानमधील गुंतवणुकीत कोणतेही स्वारस्य घेतलेले नाही. एमएडीसीच्या नावाने शंखनाद करणाऱ्या उद्योजकांनाही मिहानचे स्वरुप काय राहणार आहे, याबाबत पुरेशी माहिती नाही.
तब्बल १८ वर्षांपासून मिहानमुळे विदर्भाचा विकास होणार असल्याचे चित्र मांडले जात आहे. नितीन गडकरी, विलास मुत्तेमवार, प्रफुल्ल पटेल यांनी दाखविलेले मिहानचे स्वप्न अपूर्णच असल्याने शैक्षणिक महाविद्यालयांमधून दरवर्षी बाहेर पडणारे हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी रोजगाराच्या संधी शोधत विदर्भाबाहेर नाईलाजाने जात आहेत. विद्यार्थ्यांमध्येही या प्रकल्पाविषयी असलेल्या आशा आता संपल्या आहेत. मिहान प्रकल्पाच्या संथ गतीमुळे विदर्भातील औद्योगिक विकासाचे नकारात्मक चित्र वारंवार समोर येत असून त्याचा परिणाम उद्योजकांच्या मानसिकतेवर होऊ लागलआता दिसू लागला आहे.
टीसीएस, विप्रो, महिंद्र सत्यम या कंपन्यांचे प्रकल्प उभारणीचे काम सुरू होत आहे. टीसीएसच्या प्रकल्पाचे बांधकाम मार्च २०१४ मध्ये सुरू केले जाईल. इन्फोसिसच्या प्रकल्पाचा प्रस्ताव असला तरी सुरू होण्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. इन्फोसिसने मिहानमध्ये १५२ एकर जागा खरेदी केली असून हा इन्फोसिसचा देशातील सर्वात मोठा कॅम्पस असलेला प्रकल्प राहणार आहे. बुटीबोरी आणि हिंगणा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राचे चित्र निराशाजनक आहे. मोठय़ा किंवा अवजड उद्योगांची (भेलचा अपवाद वगळता) कोणतीही उभारणी गेल्या कित्येक वर्षांत विदर्भात झालेली नाही. हिंगणा आणि बुटीबोरीतील अनेक कारखान्यांना टाळे लागले आहेत. मिहान प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करण्याचे काम अजूनही सुरू आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने त्यात काही बाधा येत आहेत. शेतकरी जमिनींसाठी वाढीव दराची मागणी करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा