नाल्याच्या किनाऱ्यावर धोकादायक स्थितीत राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे यासाठी त्यांच्यावर नोटीस बजावण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी गुरुवारी दिले.
मुलुंड येथील गवाणपाडा अग्निशमन केंद्राजवळील बाउंड्री नाला, माहुर येथील बॉम्बे ऑक्सिजन नाला, उषानगर नाला, भांडुप येथील ए.पी.आय. नाला, मेमन कॉलेजजवळील उषानगर, दातार कॉलनी नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाला, पूर्व द्रुतगती महामार्ग जंक्शनजवळ व घाटकोपर येथील लक्ष्मीबाग नाल्यात सुरू असलेल्या सफाईच्या कामांची अजय मेहता यांनी गुरुवारी पाहणी केली. अजय मेहता यांनी या पाहणी दौऱ्यात काही रस्त्यांचीही पाहणी केली.
काही नाल्यांच्या संरक्षक भिंतीच्या बाजूला धोकादायक जागा असून पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी त्या बंदिस्त कराव्यात. किनाऱ्यालगत पडलेला गाळ तात्काळ उचलावा. नाल्याच्या किनाऱ्यांवरील काही झोपडपट्टय़ांमध्ये धोका पत्करून रहिवासी राहात आहेत. या रहिवाशांनी अन्यत्र स्थलांतर करावे यासाठी त्यांच्यावर तात्काळ नोटिसा बजवाव्यात, असे आदेश अजय मेहता यांनी दिले. डांबरीकरण करताना रस्ता ओबडधोबड होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पदपथ हे पादचाऱ्यांसाठी असून त्यावरील अनधिकृत टपऱ्या तात्काळ हटवाव्यात आणि पदपथ मोकळे करावेत, असे आदेशही त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा