जगभर अँड्रॉइड फोनधारक रोज सरासरी ३७ मिनिटे या फोनवर गेम खेळण्यात घालवतात. त्या वेळेशी आता आपण भारतीयसुद्धा बरोबरी करीत आहोत. भारतातील बहुतांश अँड्रॉइड फोन आणि टॅबलेटधारक रोज ३३.४ मिनिटे गेम्स खेळण्यात घालवतात, असे एका जागतिक सर्वेक्षणात आढळून आले आहे.
फ्युरी या संस्थेने जगभरातील ६० हजार अँड्रॉइड फोनधारकांच्या माहितीच्या आधारे हे सर्वेक्षण केले आहे. अँड्रॉइड फोनवर गेम खेळणाऱ्यांमध्ये अमेरिका आघाडीवर असून तेथील बहुतांश लोक रोज तब्बल ५१.८ मिनिटे गेम खेळतात. त्याखालोखाल जर्मनी, रशिया, इटली, दक्षिण कोरीया आणि नंतर भारत असा क्रमांक लागतो. जगातील बहुतांश स्मार्टफोनचे उत्पादन चीनमध्ये होत असले तरी हा देश गेम खेळणाऱ्या पहिल्या १० देशांच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. बहुतांश चिनी रोज २८.६ मिनिटे मोबाइलवर गेमखेळण्यात घालवतात.
या सर्वेक्षणात कोणत्या देशात कोणत्या प्रकारचे गेम खेळले जातात याचाही आढावा घेण्यात आला आहे. भारतात ‘तीन पत्ती’ आणि ‘पोकर’ असे पत्ते तसेच कॅसिनोवर आधारित खेळ खेळले जातात. अन्य देशांत मोबाइलवर क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. जर्मनी, इटली आदी देशांतील मंडळी बुद्धीला चालना देणारे गेम खेळतात तर ब्राझिल, ब्रिटन आदी देशातील नागरिक फुटबॉलसारख्या धसमुसळ्या खेळांमध्ये रमतात.
मोबाइल गेिमगचा व्यवसाय २०१७ पर्यंत २७ अब्ज डॉलरवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. या वर्षी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित स्मार्टफोनधारकांची संख्या एक अब्जावर गेली आहे. ही संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. ही संख्या मागच्यावर्षी अवघी ५३ लाख होती.