पक्षावर विसंबून न राहता उमेदवारी जाहीर करण्याची धुळे लोकसभा मतदारसंघात जणू काही स्पर्धाच लागली असून, मागील निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेले ज्येष्ठ नेते आ. अमरिशभाई पटेल यांनी खासदारकीसाठी पुन्हा रणशिंग फुंकले आहे. दुसरीकडे अद्वय हिरे यांनीही भाजपने उमेदवारी दिली तर ठीक, अन्यथा अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केल्याने या मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण आतापासूनच तापण्यास सुरुवात झाली आहे.
नाशिक आणि धुळे जिल्ह्य़ातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र मिळून धुळे लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला आहे. यामुळे कोणत्याही पक्षाला लोकसभेसाठी उमेदवार निवडताना सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतील राजकीय पाश्र्वभूमी आणि गरजा यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागतो. गेल्या वेळी प्रतापदादा सोनवणे यांचा विजय झाला तो काही केवळ भाजपच्या ध्येय-धोरणांमुळे नव्हे, तर बागलाण, सटाणा किंवा मालेगाव या तालुक्यांमधील जनतेने त्यांना दिलेली साथ आणि या भागातील सर्वपक्षीयांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. आता पुन्हा उमेदवार ठरविताना खा. सोनवणे कोणकोणत्या गावांपर्यंत पोहोचले, कोणत्या भागात किती निधी खर्च करून कोणती विकासकामे केली, कोणत्या भागाची काय मागणी आहे, पक्षाचे कोणते मोठे काम त्यांनी केले, या सर्व प्रश्नांची उत्तरे पक्ष निश्चितच मिळवील. दुसरीकडे खा. सोनवणे यांच्याऐवजी आपणास भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून अद्वय हिरे यांनी तयारी सुरू केली आहे. यामुळे उमेदवार ठरविताना भाजपपुढे नक्कीच पेच निर्माण होणार आहे. राजकीय वारसा आणि शिक्षण संस्थांचे विस्तारलेले जाळे ही अद्वय हिरे यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकेल, असे म्हटले जाते.
काँग्रेसनेही अद्याप कोणाचेच नाव पुढे केलेले नाही, परंतु पक्षातील एक वजनदार नेते असलेले शिरपूरचे आ. अमरिशभाई पटेल यांनी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे याआधीच जाहीर केले आहे. आ. पटेल यांनी आपली इच्छा व्यक्त करण्याआधीच बडोद्याचे संस्थानिक माजी खासदार सत्यजितसिंग गायकवाड यांनीही या मतदारसंघातून उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे. गायकवाड हे बडोद्याचे संस्थानिक असले तरी मालेगाव तालुक्यातील कौळाणे हे गायकवाड कुटुंबीयांचे मूळ गाव आहे. या गावात आजही त्यांच्या ऐतिहासिक वास्तू शाबूत आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात, असे म्हटले जाते.मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाचेही चांगलेच प्राबल्य असल्याने उमेदवार ठरविताना या गोष्टीचाही विचार करावा लागेल, अशी स्थिती आहे.
स्वयंघोषित उमेदवारी पक्षांसाठी डोकेदुखी धुळे लोकसभा मतदारसंघ
पक्षावर विसंबून न राहता उमेदवारी जाहीर करण्याची धुळे लोकसभा मतदारसंघात जणू काही स्पर्धाच लागली असून, मागील निवडणुकीत

First published on: 24-10-2013 at 09:43 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: So called candidate become headekh for political parties