दहावीच्या भूगोल विषयाच्या पाठय़पुस्तकातील चुकांमुळे बेजार झालेल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘मुंबई भूगोल अध्यापक मंडळा’ने पाठय़पुस्तकातील चुकांची दुरुस्ती सुचविणारा ‘पाठय़पुस्तक डागडुजी विशेषांक’ बाजारात आणला आहे.
‘मुंबई भूगोल अध्यापक मंडळ’ हीभूगोल विषय शिकविणाऱ्या आणि त्यात रस असलेल्या शिक्षक आणि प्राध्यापकांची संघटना आहे. या मंडळातर्फे ‘भूगोल अध्यापक’ हे मासिक गेली अनेक वर्षे चालविले जात होते. पण, खंड पडल्याने मंडळाला गेल्या पाच वर्षांत एकही अंक प्रकाशित करता आला नव्हता. पण, या वर्षी दहावीच्या भूगोलाच्या पाठय़पुस्तकातील चुकांमुळे मंडळाला आपले खंडित कार्य पुन्हा करण्याची प्रेरणा मिळाली आणि मंडळाने भूगोलावर ‘पाठय़पुस्तक डागडुजी विशेषांक’ म्हणून विशेष अंक बाजारात आणला. ‘दहावीच्या शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही या विशेषांकाच्या आधारे दहावीचा पाठय़पुस्तकातील भूगोल समजून घेणे सोपे होईल,’ असे भूगोलाचे एक शिक्षक राहुल प्रभु यांनी सांगितले.
या वर्षी ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने इयत्ता दहावीचे सुधारित अभ्यासक्रमानुसार भूगोलाचे पाठय़पुस्तक प्रसिद्ध केले. हे पुस्तक भूगोलाच्या एकात्मिक दृष्टिकोनाऐवजी प्रादेशिक दृष्टिकोनातून लिहिण्यात आले आहे. हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनाही नवीन आहे. त्यामुळे या पाठय़पुस्तकाच्या आधारे शिकविणे शिक्षकांना अवघड वाटते आहे. शिवाय पाठय़पुस्तकातील चुकीचे नकाशे, नकाशातील चुकीची रंगसंगती, माहितीची भरताड, संरचनात्मक चुका, असंबंद्ध भाषा, चुकीचे भाषांतर यामुळे या पाठय़पुस्तकाचा दर्जा अगदीच सुमार झाला आहे. या पाठय़पुस्तकातील अरुणाचल प्रदेशाबाबत झालेल्या चुकीचीच चर्चा जास्त झाली. पण, पुस्तकाचा दृष्टिकोन आणि मांडणीबाबत शिक्षकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर फारशी चर्चा न झाल्याने आजही विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या आधारे भूगोल अभ्यासावा लागतो आहे. अरुणाचल प्रदेशाबाबत केलेली चूक मंडळाने स्टीकर लावून दुरूस्त केली. परंतु, पाठय़पुस्तकातील इतर चुकांचे काय? म्हणूनच आम्ही हा डागडुजी विशेषांक प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला, असे ‘मुंबई भूगोल अध्यापक मंडळा’चे अध्यक्ष प्रा. विद्याधर अमृते यांनी सांगितले. एकूण ८८ पृष्ठांच्या या अंकाची किंमत १०० रुपये आहे. पण, विद्यार्थ्यांना तो ५० टक्के सवलतीत म्हणजे ५० रुपयांना उपलब्ध होईल.
अंक मिळण्याचे ठिकाण
महात्मा गांधी विद्या मंदिर, सरकारी वसाहत, वांद्रे(पू).
अंकाचे वैशिष्टय़
* सध्याच्या भूगोलाच्या पुस्तकातील सर्व प्रकारच्या
चुका व त्रुटी दर्शविणे
* त्या चुका कशा रितीने दुरुस्त करता येतील
याचे मार्गदर्शन
* भारताचा ‘एकात्मिक’ दृष्टिकोनातून
भूगोल – नकाशा व आकृत्यांद्वारे पुस्तिका
* उद्दिष्टानुसार तयार केलेली प्रश्नपेढी
दहावीच्या भूगोलाचा ‘डागडुजी विशेषांक’
दहावीच्या भूगोल विषयाच्या पाठय़पुस्तकातील चुकांमुळे बेजार झालेल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

First published on: 18-10-2013 at 08:17 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: So many errors in 10th geography book