मुकुंदराव पाटील यांनी तरवडीसारख्या ग्रामीण भागातून केली तशा समाजाभिमुख पत्रकारितेची आज खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने तरवडी (ता. नेवासे) येथील सत्यशोधक मुकुंदराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात दिनमित्र शताब्दी महोत्सव व मुकुंदराव पाटील साहित्य, तसेच पत्रकारिता पुरस्काराचे वितरण भुजबळ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री बबनराव पाचपुते होते. आमदार चंद्रशेखर घुले, शंकरराव गडाख, जि. प. चे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आमदार नरेंद्र घुले, दादा कळमकर, ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, बाळ बोठे आदी यावेळी उपस्थित होते.
सलग ५७ वर्षे तरवडीसारख्या ग्रामीण भागातून वृत्तपत्र चालवणे ही त्याकाळात अवघड गोष्ट होती. मात्र, सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या पाटील यांनी ती व्रतस्थपणे केली. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ झाले. त्यांच्या लिखाणाचा प्रसार व्हावा यासाठी व्यक्तीगत, तसेच सरकार स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन भुजबळ यांनी दिले. पालकमंत्री पाचपुते यांनी पाटील यांनी पुरोगामी व परिवर्तनवादी विचार समाजातील तळागाळापर्यंत रूजवण्याचे काम पत्रकारितेतून केले, असे सांगितले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे कसे शोषण केले जाते यावर त्यांनी प्रकाश टाकला. अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा यावर त्यांना कोरडे ओढले. त्यांच्या साहित्याचा अनमोल ठेवा जतन करण्याच्या कामाला सहकार्य करू, असे पाचपुते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला भुजबळ यांच्या हस्ते यावर्षीचा दिनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांना देण्यात आला. प्रकाश जाधव, लक्ष्मीकमल गेडाम, विष्णू कावळे, अनंता सूर, सीताराम सावंत, अ. फ. भालेराव यांना साहित्य पुरस्कार देण्यात आले. महाराव यांनी मनोगत व्यक्त केले. माजी मंत्री कोल्हे, तसेच रामदास ढमाले आदींची भाषणे झाली. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी प्रास्ताविक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा