तुमच्या मोबाईलवरील ‘व्हॉटस अ‍ॅप’वर अचानक एका कुत्रीचा फोटो आला आणि ‘तुम्ही तिचे मालक आहात का’, असे विचारले गेले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण सध्या एका कुत्रीच्या मालकाची शोध मोहीम अशा पद्धतीने सुरू आहे. मरिन लाइन्स येथील शहा कुटुंबियांना ही कुत्री रस्त्यात सापडली होती. तिच्यावर उपचार करून त्यांनी तिला घरी आणले आणि तिच्या मालकाचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली. अगदी पोलीस ठाण्यापासून, इ मेल, आणि ‘व्हॉटस अ‍ॅप’पर्यंत..
मरिन लाइन्सच्या हिंदी विद्याभवनजवळील पाटणवाला इमारतीसमोरच्या रस्त्यावर एक कुत्री गेल्या दोन दिवसांपासून फिरत होती. तिच्या गळ्यात पट्टा होता. त्यामुळे ती पाळीव असल्याचे स्पष्ट होते. पण ती कुणाकडे जात नव्हती. भुकेने व्याकुळ झाल्याने ती बेचैन झालेली होती. या इमारतीत राहणाऱ्या शिमोल शहा या तरुणीने या कुत्रीला घरात आणले. तिला उपचारासाठी परळच्या प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले. ही कुत्री ‘लासा’ जातीची असल्याचे समजले. शहा कुटुंबियांनी या कुत्रीला आपल्या घरात ठेवले आणि तिच्या मालकाचा शोध सुरू केला. मरिन ड्राइव्ह आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात कुत्री सापडल्याची माहिती दिली. ती पाळीव कुत्री असून कुणीतरी तिला शोधण्यासाठी पोलीस ठाण्यावर जाईल, अशी आशा शहा कुटुंबियांना आहे. मात्र, पोलीस ठाण्यात तक्रार करून न थांबता त्यांनी पुढचा पर्याय शोधला ‘व्हॉटस अ‍ॅप’चा. व्हॉटस अ‍ॅपच्या विविध ग्रूपवर त्यांनी या कुत्रीचा फोटो टाकून तिच्या मालकाची शोध मोहीम सुरू केली. तिचे फोटोही सर्वत्र मेल करून तिच्या मालकांना शोधण्याचे आवाहन केले आहे. या कुत्रीचे नाव शहा कुटुंबियांनी ‘लैला’ असे ठेवले आहे. आम्ही आमच्या परीने लैलाच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पोलिसांनाही आम्ही कळवून ठेवले आहे. आम्हाला तिचा एवढा लळा लागला आहे की उद्या मालक जरी सापडला तरी लैलाला परत करणे कठीण होईल, असे जयश्री शहा यांनी सांगितले.

Story img Loader