काल्पनिक देखावे, सजावटींवर भर
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळात पूर्वी असलेली सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल  गेल्या काही वर्षांत ती कमी झाली असून सजावटींवर सर्वाधिक भर दिला जात आहे. मंदिरे, राजवाडय़ांच्या प्रतिकृती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे तयार केले जात आहे. शिवाय सजावटी आणि आकर्षक रोषणाईवर जास्त भर दिला जात आहे. या देखावे आणि सजावटींच्या माध्यमातून अनेक कारागिरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
गणेशोत्सव तीन दिवसांवर आला असून शहरातील विविध भागातील सार्वजानिक गणेशमंडळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील विविध भागात देखावे तयार केले जात असताना गणपतीच्या मूर्ती घडविणाऱ्या चितारओळीत मूर्तीकारांची दिवसरात्र लगबग दिसत आहे. गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून देखावे आणि मंदिराच्या प्रतिकृती उभारण्याचे काम जिल्ह्य़ात सुरू झाले असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. काही गणेश मंडळांमध्ये स्थाानिक कलावंत काम करीत आहे तर काही ठिकाणी  मुंबई आणि कोलकाताचे कारागिर दिवस रात्र देखावे तयार करण्याचे काम करीत आहे. वेगवेगळ्या मंदिराच्या आणि ऐतिहासिक राजवाडय़ाच्या प्रतिकृती तयार करून त्यात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे.
दारोडकर चौक परिसरातील संती गणेशोत्सव मंडळातर्फे तुळजापूरच्या मंदिराची प्रतिकृती तयार केली जात आहे. उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयात केदारनाथ मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय मोठय़ा प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे. त्या सर्व लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भेंडे ले आऊटमध्ये केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली जात आहे. पर्यावरण आणि वन्यजीवाचे रक्षण करणारा देखावा धंतोलीमधील अष्टविनायक मंडळातर्फे तर सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील अशोकस्तंभ गणेशोत्सव मंडळातर्फे कृष्णलीला आणि दहीहंडीचा देखावा तयार केला जात आहे. पाताळेश्वर मार्गावर महाराचा राजा गणपती मंडळात मैसुरचा पॅलेस तर दक्षिणामूर्ती चौकात दक्षिणामूर्ती मंदिर आणि मंदिराच्या इतिहासाची माहिती देणारा देखावा तयार केला जात आहे. रेशीमबागेतील नागपूरचा राजा, धरमपेठ झेंडा चौक, पांढराबोडी, एचबी टाऊन पारडी, नरेंद्रनगर, प्रतापनगर, इतवारी, वर्धमाननगर, सदर,सीताबर्डी या परिसरात काल्पनिक देखावे तयार केले जात असून पर्यावरण, प्रदूषणमुक्त  नागपूर, गुटखाबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी सामाजिक संदेशही दिले जाणार आहेत. पांढराबोडी आणि एच बी टाऊनमधील गणेश मंडळात २२ फूट गणपतीची मूर्ती बसविण्यात येणार आहे. या दोन्ही गणपतीच्या मूर्ती चितारओळीत तयार केल्या जात आहेत.  शहरातील विविध भागात देखावे साकारणारे सागर आर्टचे नरेंद्र खवले यांनी सांगितले, गेल्या पाच- सहा वर्षांत शहरातील अनेक सार्वजानिक गणेश मंडळाचा देखावे आणि सजावटीवर भर दिसून येत आहे. मंदिराच्या किंवा पॅलेसच्या प्रतिकृती साकारण्यासाठी प्रचंड मेहनत आणि पैसा लागत असून आज त्या प्रमाणात कारागिर मिळत नाही. भेंडे ले आऊटमध्ये केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्याचे काम गेल्या एक महिन्यापासून सुरू केले आहे. एखाद्या मंदिराची प्रतिकृती साकारताना त्या मंदिराचा अभ्यास करावा लागतो. या क्षेत्रात मेहनत बरीच असली तरी पैसा मात्र त्या प्रमाणात मिळत नाही. सजावट आणि मंदिराच्या प्रतिकृती उभारण्यासाठी स्थाानिक कलावंत पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यामुळे मुंबई, पुणे आणि कोलकाताच्या कारागिरांना बोलविण्याशिवाय पर्याय नसतो, असेही खवले म्हणाले.