उपराजधानीतील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी आणि शिक्षा भोगल्यानंतर त्यांना समाजात माणूस म्हणून जगता यावे, यादृष्टीने कैद्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील काही सामाजिक संस्था कारागृहात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवित आहेत. अशा संस्थांना आता सुरक्षेच्या दृष्टीने परवानगी दिली जाणार नाही किंवा ती देताना संस्थांवर र्निबध असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मध्यवर्ती कारागृहातून पाच कुख्यात कैदी पळून गेल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. त्या ठिकाणी कैद्यांजवळ मोठय़ा प्रमाणात मोबाईल, सीमकार्डसह अनेक वस्तू सापडल्या आहेत. कारागृहात कडक सुरक्षा व्यवस्था आणि चोवीस तास पहारा असताना या सर्व वस्तू त्यांच्यापर्यंत कशा पोहोचल्या हा सुरक्षेच्या दृष्टीने मोठा गंभीर विषय असला तरी यामुळे कारागृहाची सुरक्षा व्यवस्था मात्र सपशेल अपयशी ठरली आहे. कारागृहामध्ये अनेक कैदी वेगवेगळ्या गुन्ह्य़ांमध्ये शिक्षा भोगत आहेत. त्यातील अनेक कैदी कुख्यात गुन्हेगार आहेत, तर काहींना परिस्थितीने गुन्हेगार बनवले आहे. त्यामुळे अशा कैद्यांचे समुपदेशन व्हावे, त्यांचा विकास व्हावा आणि शिक्षा भोगल्यानंतर कारागृहातून बाहेर पडल्यावर समाजात एक चांगला माणूस म्हणून जगता यावे, या दृष्टीने कारागृह प्रशासनाच्या मदतीने विदर्भातील विविध सामाजिक संस्थातर्फे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबवले जातात. अशा कार्यक्रमांमुळे कैद्यांना आनंद मिळतो आणि काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. कारागृहामध्ये वर्षभर विविध उत्सव साजरे होत असतात आणि त्याची जबाबदारी अनेक सामाजिक संस्थांना दिली जाते. त्यामुळे सहाजिकच बाहेरील अनेक नागरिक कारागृहाशी जुळले जातात. गेल्या दोन वर्षांत विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मध्यवर्ती कारागृहात अनेक कार्यक्रम सादर करण्यात आले कैद्यांमध्ये परिवर्तन व्हावे, हा उद्देश ठेवून या संस्था काम करीत असल्या तरी येणाऱ्या काळात मात्र त्यांच्यावर अनेक बंधने येणार आहेत. तसा निर्णय कारागृहातील अधिकाऱ्यांनी घेतला असल्याची माहिती मिळाली. आघाडी सरकार असताना कैद्यांचा वाद्यवृंदाचा कार्यक्रम वसंतराव देशपांडे सभागृहात सादर करण्यात आल्यानंतर त्यावेळी कैद्यांना कारागृहाच्या बाहेर आणल्यावरून आणि त्यांच्या सुरक्षेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. रक्तदान शिबीर, वेगवेगळ्या परीक्षा, दिवाळीच्या दिवसात बाहेरील कलावंतांचा मराठी गीतांचा कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम होतात. याशिवाय कारागृह प्रशासनाकडून रक्षाबंधन, दिवाळीसह इतर उत्सवाच्यावेळी कैद्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची मुभा दिली जात असल्यामुळे हा सोहळा मोठय़ा प्रमाणात साजरा होत असतो आणि त्यासाठी कैद्यांचे नातेवाईक, मित्रांना आतमध्ये सोडले जाते. अशा कार्यक्रमांमध्ये काही सामाजिक, राजकीय संघटना सहभागी होतात. हे सर्व कार्यक्रम साजरे करण्यावर आता कारागृह प्रशासनाकडून मात्र बंधने आणली जाणार आहेत. कारागृहात कुणाला आत सोडायचे आणि कुणाला नाही याबाबत प्रशासनाकडून नियमावली तयार केली जाणार आहे. कारागृहात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी संस्थांना परवानगी देताना कारागृह प्रशासनाला विचार करावा लागणार असला तरी याचा फटका कैद्यांना बसणार आहे. या संदर्भात कारागृहातील काही पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी काही बोलण्यास नकार दिला.

Story img Loader