येथील ‘मनोवेध’द्वारा आयोजित ’जाणता राजा’ या महानाटय़ाच्या मंचावर विविध क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या दादाजी खोब्रागडे, शांताराम पोटदुखे, प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, प्रा. मदन धनकर, देवाजी तोफा या सेवाव्रतींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
जिल्हा क्रीडांगणावर २६ जानेवारीपासून ‘मनोवेध’व्दारा आयोजित ‘जाणता राजा’ या महानाटय़ाच्या प्रयोगाला सुरुवात होत आहे. राज्याचे गृहमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते या नाटकाच्या प्रयोगाचे उद्घाटन होणार आहे.
यात राजकारणी असूनही सांस्कृतिक क्षेत्राचे आधारवड असलेले आणि चंद्रपूर शहराला उर्वरित महाराष्ट्राशी जोडणारे शांताराम पोटदुखे यांचा पाटील यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. २७ जानेवारीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात भरीव कार्य करणारे, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करणारे प्रा. मदन धनकर यांचा सन्मान केला जाणार आहे.
लेखामेंढा हे गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागातील गाव अचानकपणे जगासमोर आले ते देवाजी तोफा यांच्यामुळे. २९ जानेवारीला गडचिरोलीसारख्या अतीदुर्गम भागात राहून ग्रामस्वराजची कल्पना रुजवणारे व लेखामेंढाच्या यशस्वी प्रयोगातून ‘आमचा गाव, आमचे सरकार’ ही संकल्पना देशाला देणारे देवाजी तोफा यांचा सन्मान, तर ३० जानेवारीला एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांचा या मंचावर सन्मान करण्यात येईल.
३१ जानेवारीला हेमलकसा येथे आदिवासींच्या उत्थानाकरिता आयुष्य वेचणारे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा यथोचित गौरव करण्याचा मानस संस्थेद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा