आम आदमी पक्षाची जिल्हा समन्वय समिती पक्षनिरीक्षक शकील अहेमद यांनी जाहीर केली. दरम्यान, या पक्षावर जुन्या समाजवाद्यांचा पगडा राहावा, अशी व्यूहरचना सध्या केली जात असल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसत आहे.
आम आदमी पक्षाची जिल्हय़ातील मतदारनोंदणी गेले १० दिवस चालू होती. सुमारे दीड हजार जणांनी आतापर्यंत नोंदणी केली. जिल्हय़ात किमान २० हजार जणांची नोंदणी होईल, अशी माहिती आपचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली. जिल्हय़ातील अन्य पक्षांमधील मंडळी ‘आप’मध्ये येण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘आप’च्या मुख्य समन्वयकपदी डॉ. देशमुख यांची निवड झाली. सचिवपदी राजाभाऊ पतंगे, तर कोषाध्यक्षपदी राहुल धरणे यांना नियुक्त करण्यात आले. जनता दलाचे जिल्हाध्यक्ष रंगा राचुरे व युवक क्रांती दलाचे संदीपान बडगिरे यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली. उदगीरचे माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी, राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण वंगे, निशा बडगिरे, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक विठ्ठल गीते, अॅड. वैजनाथ सूर्यवंशी, प्रा. तानाजी भोसले, प्राचार्य मनोहर लोमटे आदींनी डोक्यावर ‘आप’ची टोपी घालून पक्षाची सदस्य नोंदणी केली. जिल्हय़ातील अनेक जण आपच्या माध्यमातून नवी राजकीय संधी शोधण्याच्या मार्गावर आहेत, असे सांगण्यात आले.
अण्णा हजारे यांचे बहुतांश समर्थक ‘आप’मध्ये दाखल होत आहेत. पक्षीय राजकारणापासून बाजूला राहून सामाजिक काम करण्याचा आता अनेकांना कंटाळा आल्याचे दिसून येत आहे. रविवारी अग्रसेन भवनचा परिसर मात्र ‘आप’च्या इच्छुकांनी ओसंडून वाहात होता. पक्षाच्या दिल्लीतील यशाचे कौतुक होत होते.