विश्वविद्यापीठाच्या यादीत देशातील एकाही विद्यापीठास स्थान न मिळाल्याची खंत व्यक्त करताना, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा दिल्याखेरीज शैक्षणिक दर्जा उंचावणार नसल्याची जाणीव असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. दुष्काळासह अनंत अडचणींना तोंड देताना, शासनास मर्यादा येत असून, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर नव्हे, तर जगाच्या व्यासपीठावर कर्तृत्व गाजवणारे विद्यार्थी घडविण्यासाठी समाजातील दानशूरांसह पालकवर्ग व सर्वच घटकांनी मदतीची भूमिका स्वीकारावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या वसतिगृह इमारतीचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तर, ‘रयत’चे चेअरमन अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२६ व्या जयंती सोहळय़ानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम,डॉ. एन. डी. पाटील, अनिल पाटील, अरविंद बुरूंगले, एन. एस. गायकवाड आदी रयत परिवारातील मान्यवरांसह जलसंपदा व पालकमंत्री शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की या महाविद्यालयाच्या परवानगीसाठी कर्मवीर अण्णांनी पुण्यातील कसबा पेठेतील कामगारांकडून रूपया, दोन रूपया याप्रमाणे ५० हजार रूपयांचा निधी उभा करून हे कार्य सिध्दीस नेले. त्याप्रमाणे गुणवत्ता वाढवायची असेल तर दानशूरांबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाकडून आपल्यापरीने मदत ही मिळालीच पाहिजे. जागतिक स्पध्रेचं आव्हान पेलायचं असेल तर, गुणात्मक उच्चशिक्षण मिळालेच पाहिजे, त्यासाठी राहण्याची व्यवस्था म्हणजेच वसतिगृहाची आवश्यकता आहे. कर्मवीर अण्णांनी ठिकठिकाणी बोर्डीग सुरू केले. आजच्या वसतिगृहाची गरज कर्मवीरांना त्यावेळी ज्ञात होती. आपल्या देशातील ८२ टक्के क्षेत्र पावसावर तर, ५७ टक्के लोक केवळ शेतीवर अवलंबून आहेत. आता फक्त शेतीवर अवलंबून राहणे योग्य नसून, स्पध्रेच्या युगाला तोंड देण्यास शेतक-याच्या पोरांनीही सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आजवरची मोठी माणसं पाहता ते खडतर परिश्रमातून घडले. आजच्या विद्यार्थ्यांसमोर तर सर्वसुविधा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
स्पर्धा व गुणवत्ता साध्य करणा-या संस्था व महाविद्यालयांच्या पाठीशी शासन ठाम राहील अशी ग्वाही देत, अजित पवार यांनी, वशिलेबाजीला पूर्णविराम मिळाला आहे. आता केवळ बुध्दिमत्ता व गुणवत्तेलाच महत्त्व असल्याचा विश्वास दिला. महाराष्ट्रातील शैक्षणिक क्रांती कर्मवीरांपाठोपाठ यशवंतराव चव्हाणांच्या दृष्टिकोनातून नावारूपास आली. ख-या अर्थाने राज्य व राष्ट्र घडवायचे असेल तर नॉलेज इकॉनॉमीतूनच ते शक्य आहे. अभ्यास लादल्यासारखा नव्हे, तर उत्स्फूर्तपणे केला गेला पाहिजे. सध्याच्या युगात संगणक ज्ञान असणाराच ख-या अर्थाने साक्षर असून, त्या अनुषंगाने शासन ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. आज राजकारणाला भले वाईट म्हटले जात असले,तरी करिअर म्हणून राजकारणाकडे पाहिले जावे, तरूण वर्गाने राजकारणात उतरावे, असे सुचविताना, आई-वडिलांच्या स्वप्नांना तडा जाऊ देऊ नका.  आपल्या टाळय़ांचा जोश शिक्षणात, वर्तनात दिसून यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या महाविद्यालयाने राज्यशासनाला दोन एकर जागा बक्षीसपत्र करून दिल्यास यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीसाठी राखीव शंभर कोटीच्या निधीतून येथे १० कोटी रूपये खर्चाचे भव्य व आधुनिक सांस्कृतिक संकुल उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांनी कर्मवीरांचे कार्य हिमालयासारखे उत्तुंग असून, हे कार्य व कर्मवीरांचे विचार अमर असल्याचे सांगितले. डॉ. पतंगराव कदम यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी केले. कार्यक्रमास आमदार बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, आनंदराव पाटील यांच्यासह आजी, माजी विद्यार्थी व रयतप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.