महात्मा गांधींनी त्यांच्या सत्याग्रहाची प्रेरणा ही भारतीय धर्मग्रंथ वा ब्रिटिश राजकीय नेत्यांकडून घेतलेली नसून, त्याचे मूळ ख्रिस्तपूर्व काळातील सॉक्रेटिस या ग्रीक तत्त्ववेत्त्याच्या सत्याच्या आग्रहासाठी केलेल्या बलिदानात आहे, असे मत संशोधक व तत्त्वचिंतक डॉ. सुभाष के. देसाई यांनी गांधी जयंतीनिमित्त ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना व्यक्त केले.    
डॉ. देसाई हे शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्रात ‘गांधी तत्त्वज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करतात. त्यांनी आजवर २५-३० पुस्तकांचे लिखाण केले असून, सध्या ते सॉकेट्रिसवरच्या नव्या संशोधनात्मक ग्रंथलेखनात मग्न आहेत. याअंतर्गत ग्रीकची राजधानी अथेन्स येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषदेत व्याख्यान दौरा करून ते नुकतेच परतले आहेत.
गांधींच्या सत्याग्रहामागची प्रेरणा स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले, की हिंदी लोकांच्या प्रबोधनासाठी बॅरिस्टर मोहनचंद करमचंद गांधी यांनी १९०८ मध्ये ‘इंडियन ओपिनियन’ नावाचे एक साप्ताहिक दक्षिण आफ्रिकेत चालविले होते. इंग्रजी व गुजराथी अशा दोन भाषांमध्ये ते प्रसिद्ध होत होते. या साप्ताहिकाच्या १९०८ सालच्या एप्रिल व मे महिन्यांत ‘एका सत्याग्रही सैनिकाची कथा’ (अ स्टोरी ऑफ सोल्जर ऑफ ट्रथ) नावाने गांधीजींनी ‘ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस चरित्र व जीवनकार्य’ याचा सविस्तर परिचय करून दिला होता.     
प्रारंभी गांधीजींनी ‘नि:शस्त्र प्रतिकार’ हा शब्द वापरला. नंतर सदाग्रह आणि सॉकेट्रिसच्या जीवनाचा अभ्यास केल्यावर ‘सत्याग्रह’ हा शब्द कायम वापरण्यास सुरू केले. यामागचे कारण स्पष्ट करताना डॉ. देसाई म्हणाले, अडीच हजार वर्षांपूर्वी अथेन्सच्या राजकीय व सामाजिक जीवनात जी नीतिभ्रष्टता माजली होती त्याविरुद्ध सॉकेट्रिसने तरुण पिढीला जागृत केले. त्यामुळे प्रस्थापितांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. सॉकेट्रिसला देहान्ताची शिक्षा सुनावली गेली. त्याला पळून जाणे किंवा माफी मागून सुटका करणे शक्य असताना ते नाकारून त्याने सत्याचा आग्रह कायम ठेवत मृत्यूला निर्भयपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.
या घटनेवर महात्मा गांधींनी ‘इंडियन ओपिनियन’ साप्ताहिकात लिहिले, की दक्षिण आफ्रिका व हिंदुस्थानातही आपल्याला अनेक कार्ये करावयाची आहेत. लढाया लढायच्या आहेत. त्यासाठी ‘सॉकेट्रिस’सारखे जगायला नि मृत्यूला सामोरे जायला शिकायला हवे. तो थोर सत्याग्रहीही होता. नीती, विवेकाचा मार्ग त्याने अवलंबला होता. भारताच्या पुनरुत्थानासाठी सार्वजनिक जीवनाचे अंतर्बाहय़ शुद्धीकरण करण्याची गरज गांधीजींनी शंभर वर्षांपूर्वी मांडली.    
डॉ. देसाई यांच्या मते आज गांधी असते तर त्यांनी ‘सॉकेट्रिस’चे विचार पुन्हा मांडले असते असेही ते म्हणाले. ‘सत्ता व संपत्ती, प्रतिष्ठेच्या मागे लागल्यामुळे व्यक्ती वा समाजाचे नैतिक अध:पतन व विघटन होते. यातून मद चढतो नि लालसा व उपभोगाची प्रवृत्ती बळावते.’ या त्यांच्या विचारांचा प्रसार गांधींजींनी केला असता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा