महापालिकेने महाराष्ट्र दिनापासून नागनदी स्वच्छता मोहीम हाती घेतल्यानंतर पंधरा दिवस नागनदीची साफसफाई करून ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला असला तरी अंबाझरी ओव्हर फ्लो ते पारडीपर्यंत नागनदीच्या काठावर अतिक्रमण करून वसलेल्या झोपडपट्टी आणि छोटय़ा दुकानदारांचे काय असा प्रश्न आता विविध सामाजिक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेने पुरातन आणि ऐतिहासिक अशा नागनदीचे पुनरुज्जीवन व सौंेदर्यीकरण करण्याचा संकल्प करून १५ दिवस सफाई कामगार आणि काही सामाजिक संघटनांच्या मदतीने नागनदी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविल्यानंतर गेल्या पाच सहा दिवसात विद्रुपीकरणाकडे त्याची वाटचाल सुरू झाली आहे. अंबाझरी ओव्हर फ्लो आणि पारडीपर्यंत नागनदी परिसरात मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण करून जागेचा कब्जा घेतला आहे. अनेक झोपडपट्टया अनधिकृत असतानाही गेल्या अनेक वर्षांपासून त्या राजकीय पक्षातील नेत्यांच्या वरदहस्तामुळे हटविल्या आलेल्या नाहीत.
शिवाय महापालिकेतील काही नगरसेवकांची ‘व्होट बँक’ असल्यामुळे प्रशासनाला अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
नागनदीमुळेच शहराला नागपूर ही ओळख मिळाली असताना गेल्या काही वर्षांत या नदीमध्ये कचरा टाकून ती प्रदूषित करण्यात आली असून त्याला गेल्या ३० ते ४० वर्षांपासून वसलेल्या या झोपडपट्टी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. संगम चाळ, मोक्षधाम, अशोक चौक, रेशीमबाग, वर्धमाननगर ते पारडी या भागात नागनदीच्या काठावर आठ ते दहा झोपडपट्टय़ांनी अतिक्रमण केले आहे. मोक्षधाम ते बैद्यनाथ चौक परिसरात अनेकांनी नागनदीच्या काठावर दुकाने थाटली आहेत. यापैकी काही दुकाने मधल्या काळात अतिक्रमण विरोधी पथकाने हटविली होती मात्र पुन्हा लावण्यात आली आहे.
अशोक चौक ते जगनाडे चौक या भागात झोपडपट्टी आणि काही सामाजिक संस्थानी नागनदीच्या काठावर अतिक्रमण केले त्यापैकी पक्के बांधकाम केले आहे. त्यांच्यावर त्या भागातील काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे त्यांना हटविले जात नसल्याचे बोलले जात आहे.
स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर त्या झोपडपट्टीतून मोठय़ा प्रमाणात रात्रीच्यावेळी कचरा टाकला जात असून त्यांच्यावर कुणाचे नियंत्रण नाही. पंधरा दिवस स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर जवळपास शंभरपेक्षा अधिक ट्रक गाळ आणि कचरा काढण्यात आला मात्र, आता पुन्हा एकदा कचरा साचला जात आहे. रहातेकर वाडी या भागात काही दुकानदारांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी पक्के बांधकाम केले होते मात्र, त्यांना कारवाईच्या वेळी हटविण्यात आल्यानंतर पुन्हा त्यांनी दुकान थाटण्यात आली आहेत. एकीकडे शहराच्या विविध भागातील वाढते अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असताना नागनदीच्या काठावर वसलेल्या अनधिकृत झोपडपट्टयांना का हटविले जात नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात महापालिकेचे अधिकारी प्रकाश उराडे यांनी सांगितले, नागनदीच्या काठावर वसलेल्या अनधिकृत झोपडपट्टी हटविण्याचा विषय सध्या अजेंडय़ावर नाही. नागनदी स्वच्छ करून फक्त सौंदयीकरणाचे तेवढे काम सुरू आहे. अतिक्रमणाची कारवाई सुरू केली तर नागनदी स्वच्छतेच्या विषयाकडे दुर्लक्ष होईल. अतिक्रमणाच्या संदर्भातील निर्णय वेळ आल्यास प्रशासन आणि पदाधिकारी पातळीवर घेतला जाईल, असेही उराडे यांनी सांगितले.
‘व्होट बँक’ असलेल्या झोपडपट्टय़ांवर अतिक्रमण हटाव विभागाची मेहरनजर
महापालिकेने महाराष्ट्र दिनापासून नागनदी स्वच्छता मोहीम हाती घेतल्यानंतर पंधरा दिवस नागनदीची साफसफाई करून ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला असला तरी अंबाझरी ओव्हर फ्लो ते पारडीपर्यंत नागनदीच्या काठावर अतिक्रमण करून वसलेल्या झोपडपट्टी आणि छोटय़ा दुकानदारांचे काय असा प्रश्न आता विविध सामाजिक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
First published on: 24-05-2013 at 03:19 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soft corner on vote bank slums