स्टेनलेस स्टीलची बांधणी असलेली लोकल, चांगली बैठक व्यवस्था, हवेशीर मोठय़ा खिडक्या, आधुनिक डिस्प्ले बोर्ड आणि कधीही न खराब होणारा देखणा गुलाबी रंग अशा वैशिष्टय़ांनी सजलेली बंबार्डिया लोकल उपनगरीय रेल्वेच्या सेवेत दाखल होणार आहे. मात्र सेवेत दाखल होण्यापूर्वी या लोकलच्या क्षमतेची चाचणी घेताना डब्यांमध्ये चक्क मातीच्या गोण्या भरण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नव्या कोऱ्या लोकलमधून प्रवास करण्यास उत्सुक प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. या नव्या कोऱ्या गाडीची चाचणी घेण्यासाठी मातीच्या ओझ्याव्यतिरिक्त अन्य शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब व्हायला हवा होता, असे मत प्रवासी व्यक्त करीत आहेत.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या मदतीने उपनगरीय रेल्वे सेवेमध्ये जर्मन बनावटीच्या ७२ बंबार्डिया लोकल्सची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांचा आणि परिस्थितीचा अभ्यास करून या लोकलची निर्मिती केल्याचा दावा रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आला असून ऑक्टोबर २०१३ ला त्यातील पहिली लोकल पश्चिम रेल्वेच्या सेवेत दाखल झाली. लोकलच्या नव्या गुलाबी रंगाचे आकर्षण प्रवाशांना पहिल्यापासूनच होते आणि त्यातून प्रवास करण्यासाठी प्रवासीही मोठय़ा प्रमाणात उत्सुक आहेत. पश्चिम रेल्वेने ही लोकल मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकात तपासणीसाठी पाठवली होती. मात्र हीच लोकल सध्या परीक्षणाच्या फेऱ्यात अडकली असून तिच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून कल्याण स्थानकात निरनिराळे प्रयोग सुरू आहेत. लोकलची चाचणी घेण्यासाठी त्यामध्ये मातीच्या गोण्या भरल्या असून त्यामुळे या लोकलच्या सौंदर्यावर त्याचा परिणाम होईल, अशी भीती प्रवासी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात सेवेत दाखल होण्यापूर्वीच या लोकलच्या दुर्दशेची चर्चा सुरू झाली आहे.
चाचणीसाठी हवी शास्त्रोक्त पद्धत
सध्या नव्या गाडीची चाचणी घेण्याची प्रचलित पद्धत अनाकलनीय असून त्यामुळे नव्या कोऱ्या लोकलची दुर्दशाच होत आहे. आता काळानुसार तंत्रज्ञान बदलूनही रेल्वे प्रशासन चाचणीसाठी अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धत वापरत नाही हे दुर्दैवी आहे. यामुळे खराब लोकलच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी दिली.    
लोकल गाडीला धोका नाही..
पश्चिम रेल्वेच्या मालकीची लोकल सध्या तपासणीसाठी कल्याणमध्ये आणली असून ती एसी विद्युत वाहिनीवर चालणार आहे. रिकामी लोकल पाहून अनेक प्रवासी त्यामध्ये चढतात, त्यांना रोखण्यासाठी मातीच्या गोण्या टाकण्यात आल्या आहे. शिवाय माणसांच्या गर्दीचे वजन वाहून नेण्याची क्षमताही या गोण्यांमुळे तपासता येणार आहे. या परीक्षणामुळे लोकल गाडीला कोणत्याही प्रकारची हानी नसल्याचे कल्याणमधील रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अफवांना ही ऊत..
मुंबईमध्ये एसी लोकल अशा आशयाचे मेसेज सध्या व्हॉट्स अ‍ॅपवर सुरू झाले असून त्यासाठी बंबार्डिया लोकलची छायचित्रे एकमेकांना पाठवण्यास सुरुवात झाली आहे. खरे तर ही लोकल  २५०० विद्युत प्रवाहाच्या डीसी विद्युतवाहिनीऐवजी ३५०० विद्युत प्रवाहाच्या एसी वाहिनीवरून चालणार आहे. या एसी-डीसीच्या गैरसमजुतीमुळे अशी चुकीची माहिती पसरली जात असल्याचे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे.

Story img Loader