शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर सामान्य शिवसैनिक व नागरिकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला असतानाच अखेर दुर्दैवाने ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र शोकाकूल वातावरण पसरले. शहर व जिल्ह्य़ातील सर्व बाजारपेठा स्वयंस्फूर्त बंद ठेवण्यात आल्या. बहुसंख्य शिवसैनिकांनी मुंबईकडे शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यदर्शनासाठी तातडीने प्रयाण केले. शिवसेनाप्रमुखांनी सोलापूरकरांशी जपलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यांना यानिमित्ताने उजाळा मिळाला. विशेषत: बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने सोलापूरचे ऐतिहासिक होम मैदान आता उदास वाटू लागले आहे. याच विस्तीर्ण मैदानावर बाळासाहेबांच्या ऐतिहासिक सभा होत असत.
शिवसेनेने हिंदुत्ववादाची भूमिका अंगिकारली नव्हती, तेव्हापासून मराठीच्या मुद्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा सोलापूरशी संबंध होता. १९८१-८२ च्या सुमारास बाळासाहेब ठाकरे यांची पहिली जाहीर सभा चार हुतात्मा पुतळ्यांजवळ झाली होती. त्यांच्यासमवेत खासगी सुरक्षारक्षकांचा ताफा होता. त्यावेळी शिवसेनेचा झंझावात नव्हता. त्यावेळच्या भेटीत बाळासाहेबांनी त्यांचे सोलापुरातील जीवलग मित्र तथा महाराष्ट्रातील झुंजार संपादक रंगा वैद्य यांच्या दै. संचार कार्यालयात धाव घेऊन वैद्य यांची भेट घेतली होती. संचार कार्यालयात बाळासाहेबांनी संपादकीय विभागासह अन्य कर्मचारी व कामगारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांच्या चर्चेत मराठीचा मुद्दा नव्हता तर कामगारहिताचा मुद्दा मांडला होता. १९८२ नंतर शिवसेनेची वाढ होत गेली तसतशा सोलापुरातही शिवसेना शाखा स्थापन होऊ लागल्या. तो काळ मुंबईबाहेर महाराष्ट्रात शिवसेनेसाठी मंतरलेला होता. त्यामुळे सेनेचे अनेक छोटे-मोठे नेते सोलापुरात येऊ लागले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी नंतर उशिरा म्हणजे १९८९ साली सोलापूरचा दौरा केला. त्यावेळी रात्री उशिरा बाळासाहेबांचे सातरस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात आगमन होताच तमाम शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण झाला होता. त्यावेळी रात्री थकून भागून आलेल्या बाळासाहेबांनी पत्रकारांच्या आग्रहास्तव विश्रामगृहातून पुन्हा बाहेर येऊन छायाचित्रकारांसाठी खास ‘पोज’ दिली होती. दुसऱ्या दिवशी त्यांची होम मैदानावर झालेली जाहीर सभा ऐतिहासिक ठरली. कारण त्यापूर्वी या मैदानावर दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सभा झाल्या होत्या. त्यानंतर लाखोंची गर्दी खेचणारी सभा बाळासाहेबांचीच झाली.
पुढे १९९० साली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे सोलापुरात आले होते. त्यांच्या समवेत भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन होते. ठाकरे व महाजन यांची संयुक्त जाहीर सभा होम मैदानावर झाली. नंतर हा सिलसिला असाच सुरू राहिला. यात बाळासाहेब ठाकरे यांची विराट सभा व होम मैदान यांचे जणू समीकरणच तयार झाले होते. १९९२ साली बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर हिंदुत्वाचा ज्वर वाढला. तेव्हा शिवसेनेचा झंझावात आणखी वाढत गेला. १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी बाळासाहेबांनी सोलापूरसह पंढरपूर, बार्शी, कुर्डूवाडी, करमाळा आदी ठिकाणी जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यावेळी सोलापूरची लक्ष्मी-विष्णू कापड गिरणी बंद पडली होती. ही बंद कापड गिरणी पुन्हा सुरू करण्याचा शब्द बाळासाहेबांनी सोलापूरकरांना दिला होता. परंतु प्रत्यक्षात ही कापड गिरणी पुढे कधीच चालू होऊ शकली नाही. बाळासाहेबांनी प्रत्येक जाहीर सभेत त्यांनी सोलापूरकरांना शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले खरे; परंतु त्याप्रमाणात त्यांना साथ मिळाली नाही. अपवाद केवळ २००४ सालचा. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातून उत्तमप्रकाश खंदारे (उत्तर सोलापूर राखीव), राजेंद्र राऊत (बार्शी), जयवंत जगताप (करमाळा) व रतिकांत पाटील (दक्षिण सोलापूर पोटनिवडणूक) असे तब्बल चार आमदार निवडून गेले होते. मात्र पुढे हे यश टिकविता आले नाही. पुढे दुर्दैवाने यापैकी उत्तमप्रकाश खंदारे यांचा अपवाद वगळता उर्वरित तिन्ही आमदारांनी शिवसेनेची साथ सोडली. सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर शिवशरण पाटील हेसुध्दा निवडून येऊन आमदार झाले होते.
उत्तमप्रकाश खंदारे हे सलग तीनवेळा आमदार झाले. युतीच्या काळात त्यांना मंत्रिपदही मिळाले होते. सामान्य शिवसैनिकांना आमदारकी मिळाली, तर काही शिवसैनिकांना महामंडळे मिळाली. परंतु मिळालेल्या सत्तेचा वापर शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी होऊ शकला नाही, उलट, निष्ठावंत शिवसैनिकांच्या पदरी उपेक्षा आली.
यात साईनाथ अभंगराव, बाबुराव वडणे यांची नावे आवर्जून नमूद करता येतील. शहर व जिल्ह्य़ात सेनेची ताकद न वाढता मर्यादित स्वरूपात राहिली, तरी सामान्य शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी कमालीची श्रध्दा तथा निष्ठा कायम तेवत राहिली.
सोलापूर झाले उदास..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर सामान्य शिवसैनिक व नागरिकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला असतानाच अखेर दुर्दैवाने ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वत्र शोकाकूल वातावरण पसरले.
First published on: 18-11-2012 at 01:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur becane sad