सोलापुरातील व्यापारी, उद्योजक व कारखानदारांच्या अडचणी आहेत, त्या माझ्याच अडचणी आहेत. त्यामुळे एलबीटी प्रश्नावर आपण सारेजण एकत्र बसून मुख्यमंत्र्यांशी बोलू. मात्र या प्रश्नावर सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्समधील मंडळींनी राजकारण बाजूला ठेवावे. राजकारण केले तर त्यातून काही साध्य होणार नाही, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केली. एलबीटीच्या विरोधात आंदोलन करणारे चेंबरचे प्रभाकर वनकुद्रे यांना शिंदे यांनी खडे बोल सुनावत चांगलेच फटकारले. त्यामुळे हा मेळावा गाजला.
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने गांधी नगरातील हेरिटेज प्रांगणात व्यापारी, उद्योजक व कारखानदारांचा मेळावा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. चेंबरचे सलग २८ वर्षे नेतृत्व सांभाळलेले ज्येष्ठ उद्योगपती प्रेमरतन दमाणी यांचा शिंदे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे, महापौर अलका राठोड व उपमहापौर हारून सय्यद यांच्यासह माजी अध्यक्ष धर्मण्णा सादूल, उद्योजक दत्ता सुरवसे आदी उपस्थित होते. चेंबरचे प्रवक्ते पशुपती माशाळ यांनी प्रास्ताविक केले, तर कार्याध्यक्ष विश्वनाथ करवा यांनी चेंबरच्या कार्याचा आढावा सादर केला. चेंबरचे अध्यक्ष सिद्धेश्वर बमणी यांच्या हस्ते सुशीलकुमार शिंदे यांचा ग्रामदैवत सिद्धेश्वराची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
एलबीटी प्रश्नावर व्यापाऱ्यांनी काळजी करू नये, धास्ती घेऊ नये, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांबरोबर बैेठक घेण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशा शब्दात दिलासा देत शिंदे यांनी एलबीटीचा प्रश्न सोडविताना शहरातील सुविधांकडे लक्ष देण्याचीही गरज असल्याचे स्पष्ट केले. चेंबरमध्ये राजकारण आणू नका, राजकारण सोडून केवळ चेंबरचे काम करा, त्यात पक्षीय दृष्टी लावू नका, असा सल्ला देत शिंदे यांनी एलबीटीविरोधी आंदोलनाचे नेते प्रभाकर वनकुद्रे यांना चांगलेच फटकारले.
सोलापूरकडे खेडेगाव म्हणून नकारात्मक नजरेतून पाहिले जाऊ नये. जर हे खेडेगाव असते तर या ठिकाणी महापालिका परिवहन उपक्रमाकडे व्हाल्वो बसेस आल्या असत्या का, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. शहरात काही नवीन उद्योग प्रकल्प आपण आणले, तर आलेले काही उद्योग पळून गेले. सोलापूरकरांची अपेक्षा नसताना आपण बोरामणी विमानतळाची पूर्तता करतोय, मुंबईसाठी दुसरी रेल्वे सुरू केली. पुणे-सोलापूर-हैदराबाद महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे. सत्तेवर असो वा नसो, सोलापूरच्या विकासाचा प्रयत्न करीत राहू. शेवटी सोलापूर माझे आहे, अशा शब्दात शिंदे यांनी विकासाची ग्वाही दिली.
यावेळी प्रभाकर वनकुद्रे यांनी एलबीटीचा प्रश्न मांडताना त्या विरोधात व्यापारी व उद्योजकांनी आंदोलन उभे केले असता पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आकसबुद्धीने व्यापाऱ्यांच्या घरांचे मोजमाप घेऊन दमनशाही केल्याची तक्रार केली. बांधकाम व्यावसायिक किशोर चंडक यांनी शहरात माहिती व तंत्रज्ञानावर आधारित तीन नवे प्रकल्प येण्यासाठी शिंदे यांना साकडे घातले. सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनीही भाषण केले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.
एलबीटी प्रश्नावर सोलापूर चेंबरने राजकारण करू नये
सोलापुरातील व्यापारी, उद्योजक व कारखानदारांच्या अडचणी आहेत, त्या माझ्याच अडचणी आहेत. त्यामुळे एलबीटी प्रश्नावर आपण सारेजण एकत्र बसून मुख्यमंत्र्यांशी बोलू. मात्र या प्रश्नावर सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्समधील मंडळींनी राजकारण बाजूला ठेवावे. राजकारण केले तर त्यातून काही साध्य होणार नाही, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केली.
First published on: 25-02-2014 at 03:25 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur chamber should not be politics on lbt