महाराष्ट्राला सोलापूरसाठी दोन टीएमसी पाणी आलमट्टी धरणातून सोडण्याच्या मोबदल्यात कर्नाटकने महाराष्ट्राकडे जादा आठ टीएमसी पाणी मागितल्याने सोलापूरला आलमट्टी धरणातून पाणी मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त सोलापूरसाठी उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातून पाणी सोडावे अशी मागणी असताना त्यास वाटाण्याच्या अक्षता लावत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आलमट्टी धरणातून पाणी घेण्याचा प्रस्ताव आणला आहे. कर्नाटकाने या प्रश्नावर घेतलेल्या अव्यवहार्य व आडमुठय़ा भूमिकेमुळे सोलापूरला आलमट्टी धरणाचे पाणी मिळण्याची शक्यता दुरापास्त असल्याची प्रतिक्रया व्यक्त होत आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थिती वरचेवर बिकट होत असताना त्यावर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्य़ातूनच पाणी मिळावे अशी मागणी आता जोर धरण्याची शक्यता असून त्यादृष्टीने जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा नकारात्मक स्वरूप धारण करीत असताना त्याचा लाभ घेत पाण्याच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसण्याची तयारी सुरू केली आहे. तर या एकंदरीत घडामोडीमुळे जिल्ह्य़ात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची कोंडी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातील धरणांतून पाणी मिळण्याची मागणी सोलापूर जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे आमदार गेल्या दोन महिन्यांपासून करीत आहेत. मात्र गेल्या महिन्यात २१ डिसेंबर रोजी नागपूर येथे राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळी या प्रश्नावर सोलापूरच्या लोकप्रतिनिधींची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती. त्यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्य़ातील पाणी देण्यास सपशेल नकार देत त्याऐवजी आलमट्टी धरणाचे पाणी घेण्याचा सल्ला दिला होता. नंतर अलीकडेच अकलूज येथे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत पुण्यातील भामा-आसखेड धरणातून दोन टीएमसी पाणी मिळण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लावून धरली होती. विशेषत: माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी त्यासाठी जोरदार आग्रह धरला होता. परंतु सोलापूरसाठी पुण्याचे पाणी मिळण्याची मागणी तर सोडाच, साधी चर्चाही करू नका, त्यामुळे सोलापूरची जनता जागी होईल, अशा शब्दात  पवार काका-पुतण्यांनी बजावले होते. पुण्याऐवजी आलमट्टी धरणातून दोन टीएमसी पाणी गरज पडल्यास विकत घेऊन देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते.
दरम्यान, या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडून कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा चालविला असता महाराष्ट्राला दोन टीएमसी पाणी देण्याच्या मोबदल्यात कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारकडे जादा आठ टीएमसी पाणी मागितले आहे. कर्नाटक शासनाचा हा प्रस्ताव अव्यवहार्य असून तो महाराष्ट्र सरकारकडून मान्य होण्याची चिन्हे अजिबात दिसत नाहीत.
महाराष्ट्राने गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्य़ातील दूधगंगा धरणातून दोन टीएमसी पाणी सोडले होते. यंदाच्या वर्षीही दूधगंगा धरणातून आलमट्टी धरणात दोन टीएमसी पाणी सोडायचे आणि त्या मोबदल्यात आलमट्टी धरणातून सोलापूरसाठी नारायणपूर प्रकल्पाद्वारे इंडीच्या कालव्यावाटे पाणी सोडायचे असा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक शासनाकडे पाठविला होता. याबाबतची दोन पत्रेही पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना पाठविली होती. परंतु कर्नाटक सरकारने त्या मोबदल्यात जादा आठ टीएमसी पाणी मागितल्याने पाणी प्रश्नाची कोंडी सुटण्याची सूतराम शक्यता नसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे तहानलेल्या सोलापूरसाठी आलमट्टी धरणाचे पाणी मिळण्याची चिन्हे धुसर झाल्याने येथील पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीचा विचार करता सोलापूरसाठी पुणे जिल्ह्य़ातून पाणी मिळणे सर्व दृष्टीने सोयीस्कर आहे. विशेषत: उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या पुण्याच्या भामा-आसखेड धरणातून दोन टीएमसी पाणी मिळणे सहज शक्य आहे. भामा-आसखेड धरणातील उपलब्ध आठ टीएमसी पाण्याचा वापर सिंचन व पिण्यासाठी न होता तो पाणी साठा तसाच पडून आहे. त्यामुळे त्यातील दोन टीएमसी पाणी सोलापूरसाठी उजनी धरणात सोडावे अशी मागणी जोर धरत असताना त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नकारात्मक भूमिका घेतली आहे. एवढेच नव्हे तर सोलापूरकरांनी पाणी मागणी उचलून धरली असताना पवार यांनी अलीकडेच भामा-आसखेड धरणातील साडेचार टीएमसी पाणी पुणे शहरासाठी पिण्याकरिता राखून ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर सोलापूरची गळचेपी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा