हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बानहुसेन अल्पसंख्याक महिला कामगार घरकूल योजनेसाठी सोलापूर ते मुंबई पायी मोर्चा काढण्याची घोषणा, या घरकुल प्रकल्पाचे अध्वर्यू तथा ‘सिटू’चे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केली. या घरकुल योजनेच्या उभारणीसाठी शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप आडम मास्तर यांनी केला.
पोलीस मुख्यालयाजवळील अ‍ॅचिव्हर्स सभागृहात आयोजित सभासद महिला मेळाव्यात आडम मास्तर बोलत होते. या वेळी संस्थेच्या सभासदांना नियोजित घरांची कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. संस्थेच्या २३ हजार सभासदांनी नऊ कोटी ४२ लाख ५३ हजार ५०० रुपये संस्थेकडे जमा केले होते. त्यातून अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी गावच्या हद्दीत १९६ एकर जमीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यापैकी चार एकर जमिनीची खरेदी झाली आहे. मुद्रांक शुल्कमाफीचा प्रश्न सुटल्यानंतर सर्व जमिनीची खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे आडम मास्तर यांनी नमूद केले.
या घरकुल प्रकल्पासाठी राज्य व केंद्र सरकारकडून तातडीने अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी संघर्षही करावा लागेल. प्राप्त परिस्थितीत शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर ते मुंबई पायी मोर्चा काढण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. त्यास उपस्थित महिला सभासदांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. यापूर्वी दहा हजार  सामान्य विडी महिला कामगारांसाठी आडम मास्तर यांनी कुंभारी येथे कॉ. गोदूताई परूळेकर विडी घरकुल प्रकल्प साकारला होता. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून भरीव अनुदान मिळाले होते. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते या घरकुल प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता.