रसातळाला गेलेल्या सोलापूर महापालिका परिवहन विभागाला नवसंजीवनी देण्यासाठी पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केंद्र शासनाच्या योजनेतून सुमारे दोनशे बसेस मंजूर करून घेतल्यानंतर परिवहन विभागाच्या व्यवस्थापनाकडेही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी या विभागाची सूत्रे त्यांनी स्वत:कडे घेतली आहेत.
सुमारे दहा लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था डबघाईला आली असून, महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत सध्या १२०पकी जेमतेम निम्म्याच बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे आíथक उत्पन्नही घटले आहे. या विभागात कार्यक्षम व तज्ज्ञता असलेला व्यवस्थापक गेल्या पाच-सहा वर्षांपासून लाभला नाही. त्या अगोदरही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांनी तत्कालीन पालिका आयुक्त मिच्छद्रनाथ देवणीकर यांच्या प्रोत्साहनामुळे परिवहन विभागाची सूत्रे हाती घेऊन अल्पावधीतच अचूक व कार्यक्षम व्यवस्थापनाद्वारे या विभागाला ऊर्जतिावस्था प्राप्त करून दिली होती. एवढेच नव्हेतर त्या वेळी राज्य शासनाने राजीव गांधी प्रशासकीय अभियानाचा प्रथम पुरस्कार पालिका परिवहन विभागाला मिळाला होता. परंतु मदने यांनी सूत्रे सोडल्यानंतर हा परिवहन विभाग पुन्हा अडचणींच्या फेऱ्यात सापडला.
या पाश्र्वभूमीवर पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केंद्र शासनाच्या योजनेतून परिवहन विभागासाठी सुमारे दोनशे बसेस मंजूर करून घेतल्या आहेत. सोलापूरकरांसाठी हा सुखद दिलासा असला तरी प्रत्यक्षात या नवीन दोनशे बसेस चालविण्याचे व्यवस्थापन पालिका परिवहन विभागाला झेपणे कितपत शक्य आहे, याबाबत शंका व्यक्त होत असतानाच अखेर आयुक्त गुडेवार यांनी स्वत: परिवहन विभागाची सूत्रे स्वत:कडे घेतल्यामुळे या विभागात सुधारणा होण्याच्या दृष्टीने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  

Story img Loader