आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर राखीव मतदार संघ शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीतून रिपब्लिकन पक्षाला सोडावा. या मतदार संघातून रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजा सरवदे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी रिपाइंचे सोलापूर शहराध्यक्ष सिध्देश्वर पांडगळे यांनी केली आहे. सोलापूरची जागा रिपाइंला न सुटल्यास येथून रिपाइंतर्फे राजा सरवदे हे उभेच राहणार असल्याचेही पांडगळे यांनी नमूद केले आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीसाठी दिलेल्या निवेदनात पांडगळे यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघात रिपाइंचे मोठे काम असल्याचा दावा केला आहे. महायुतीमध्ये सोलापूरची जागा भाजपकडे आहे. परंतु निवडून येण्याइतपत सशक्त उमेदवार भाजपकडे नाही. रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजा सरवदे यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पक्ष वाढविला असून विविध नागरी प्रश्नावर त्यांनी नेहमीच आवाज उठविला आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी सरवदे यांच्याशिवाय दुसरा सक्षम उमेदवार नाही. महायुतीतून सोलापूर लोकसभेची जागा रिपाइंला सोडावी, अन्यथा रिपाइं स्वतंत्रपणे ही जागा लढविणार असल्याचे पांडगळे यांनी निवेदनात म्हटले आहे. राजा सरवदे हे लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करीत आहेत. गेल्या महिन्यात त्यांचा वाढदिवस मोठय़ा प्रमाणात साजरा झाला. त्यावेळी शहर व जिल्ह्यात सर्वत्र त्यांच्या वाढदिवसाचे डिजिटल फलक लावण्यात आले होते. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या नजरा रिपाइंच्या  हालचालीकडे वळल्या आहेत. 

Story img Loader